बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सामन्यांची कार्यक्रमपत्रिका निश्चित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय क्रिकेटपटूंना २०१९ ते २०२३ या कालावधीत पूर्वीपेक्षा ३० लढती जास्त खेळाव्या लागणार  असल्या तरी सामन्यांचे दिवस मात्र कमी झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विशेष सर्वसाधारण सभेत कार्यक्रमपत्रिका निश्चित केली.

बीसीसीआयने ही कार्यक्रमपत्रिका निश्चित करताना खेळाडूंना थकवा जाणवणार नाही व पुरेशी विश्रांती दिली जाईल, ही कर्णधार विराट कोहलीने केलेली सूचना मान्य केली आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका या तुल्यबळ संघांबरोबर होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या संख्येत वाढ केली आहे.

‘‘पूर्वी तयार केलेल्या कार्यक्रमपत्रिकेत कसोटी, एकदिवसीय व ट्वेन्टी२० अशा तीन स्वरूपांच्या ५१ सामन्यांचा समावेश होता. त्यामध्ये सुधारणा करत आणखी ३० सामन्यांची भर घालण्यात आली आहे. मात्र सामन्यांचे दिवस २० टक्क्यांनी कमी होणार आहेत. ट्वेन्टी२०च्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे,’’ असे बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले.

भारतात २०२१ मध्ये आयोजित केलेली आयसीसी चॅम्पियन्स करंडक  स्पर्धा व २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विश्वचषकाचा या कार्यक्रमपत्रिकेत समावेश नाही. बीसीसीआयविरुद्ध आयपीएलमधील कोची टस्कर्स संघाने न्यायालयीन लढाई जिंकली असून, त्यांनी बीसीसीआयकडून ८५० कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या निर्णयाविरुद्ध बीसीसीआयने अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान क्रिकेट संघटनेवरील बंदी उठवली

बीसीसीआयने राजस्थान क्रिकेट संघटनेवरील (आरसीए) सशर्त बंदी उठवण्याचा निर्णय विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. आयपीएलचे निलंबित माजी अध्यक्ष ललित मोदी हे संघटनेतून बाहेर पडल्याने बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी यावेळी सांगितले. जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी संघटनेशी (वाडा) संलग्न असल्याने राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संघटनेकडून (नाडा) क्रिकेटपटूंची चाचणी घेण्याची आवश्यकता नसल्यानेही बीसीसीआयतर्फे स्पष्ट करण्यात आले.

अफगाणिस्तानची पहिली कसोटी भारताबरोबर

मर्यादित षटकांच्या सामन्यात दमदार कामगिरी केल्यानंतर अफगाणिस्तानला जूनमध्ये कसोटी क्रिकेटचा दर्जा देण्यात आला होता. आता त्यांचा पहिला कसोटी सामना भारताबरोबर २०१९-२०२० या दरम्यान होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भविष्यातील सामन्यांचे वेळापत्रक सोमवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ठरवण्यात आले. या वेळी अफगाणिस्तानचा  पहिला सामना भारताबरोबर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात येणार होता. पण अफगाणिस्तान आणि भारत यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध आहेत. त्यांचा संघ भारतातच सराव आणि सामने खेळत आहे. त्यामुळे त्यांचा पहिला कसोटी सामना भारताबरोबर खेळवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अफगाणिस्तानसाठी हा ऐतिहासिक क्षण असेल.’ असे बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अफगाणिस्तान आणि आर्यलड यांना जून महिन्यात कसोटी क्रिकेटचा दर्जा दिला होता. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांचा यादीमध्ये त्यांचा अनुक्रमे अकरावा आणि बारावा क्रमांक आहे. अफगाणिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती असल्यामुळे अफगाणिस्तानचा संघ भारतामध्ये सराव करत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Match schedule confirmed in bcci meeting
First published on: 12-12-2017 at 01:25 IST