Matthew Breetzke World Record: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. या दुसऱ्या वनडेमध्ये खेळताना त्याने अर्धशतकी करताच मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. दुसऱ्या वनडेमध्ये संघाने लवकर दोन विकेट्स गमावल्यानंतर ब्रिट्झकेने जॉर्जीच्या साथीने संघाचा डाव सावरला. अवघ्या काही धावांसाठी त्याचं शतक हुकलं आणि ८८ धावांवर तो बाद झाला. मात्र सर्वात मोठा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.
मॅथ्यू ब्रिटझकेने फेब्रुवारी २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये त्याने वनडे सामन्यात पदार्पण केलं होतं आणि पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध शतक झळकावण्याचा कारनामा केला होता. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात तिरंगी मालिका खेळवली जात होती. त्यापैकी एका सामन्यात ब्रिट्झकेने शतकी खेळी करण्याचा पराक्रम केला होता.
मॅथ्यू ब्रिट्झकेने घडवला इतिहास
मॅथ्यू ब्रिट्झकेने आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतक केलं. यासह ब्रिट्झके हा एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज आहे, ज्याने त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या चार एकदिवसीय सामन्यांमध्ये चार वेळा पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
ब्रिट्झकेने लाहोरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता, ज्यात त्याने ५ षटकारांच्या मदतीने १५० धावा केल्या. हा देखील एक विश्वविक्रम आहे कारण तो एकदिवसीय पदार्पणात १५० धावा करणारा पहिला खेळाडू आहे. ब्रिट्झकेने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज डेसमंड हेन्सचा विक्रम मोडला, ज्याने १९७८ मध्ये पदार्पणाच्या सामन्यात १४८ धावा केल्या होत्या. ब्रिट्झके एकदिवसीय पदार्पणात शतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा चौथा फलंदाज ठरला आणि पाकिस्तानमध्ये अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला.
मॅथ्यू ब्रिट्झकेने १५० धावांच्या खेळीनंतर कराचीमध्ये पाकिस्तानविरूद्ध सामन्यात ८३ धावांची खेळी केली होती. आता सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ५७ धावांची खेळी केली होती. मॅकेमधील सामन्यातील अर्धशतकी खेळीनंतर त्याने वनडे क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
भारताच्या या फलंदाजाने केलेला असा पराक्रम
भारताच्या नवजोत सिंग सिद्धूने त्याच्या कारकिर्दीत अशीच कामगिरी केली होती. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने पहिल्या चार डावांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या. पण पहिल्या दोन सामन्यांनंतर, सिद्धूने तिसऱ्या सामन्यात फलंदाजी केली नाही. यामुळे त्यांनी पहिल्या पाच सामन्यात ५० अधिक धावा करण्याचा विक्रम केला. त्यामुळे मॅथ्यू ब्रिटझकेचा विक्रम खूपच अनोखा आहे.