टी २० वर्ल्डकप स्पर्धेत २४ ऑक्टोबरला भारत विरूद्ध पाकिस्तान सामना आहे. या सामन्याची क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या खास सामन्यापूर्वी ‘मौका-मौका’ प्रोमोची पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. टी २० वर्ल्डकप सामन्यापूर्वीचा प्रोमो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान एकदिवसीय आणि टी २० विश्वचषकात एकूण १२ सामने झाले आहे. या १२ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. एकदिवसीय वर्ल्डकप सामन्यात भारताने ७ सामन्यात आणि टी २० वर्ल्डकपमध्ये ५ सामन्यात विजय मिळवला आहे.

“नवा मौका मौका..नवी ऑफर..एक खरेदी करा एक मोफत मिळवा”, असं स्टार स्पोर्टने ट्वीट करताना लिहिलं आहे. त्याचबरोबर भारत पाकिस्तान सामन्यासाठी तयार आहात ना, असं लिहिलं आहे.

यापूर्वी २०१५ वर्ल्डकपपूर्वी ‘मौका-मौका’ जाहिरातीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सने मौका-मौका प्रोमो जारी केला होता. हा प्रोमो क्रीडाप्रेमींनी डोक्यावर उचलला होता.

आयसीसी वर्ल्डकप २०१९ भारत पाकिस्तान सामन्यापूर्वीही प्रोमोचा जोरदार चर्चा रंगली होती.

टीम इंडियाने २००७ पासून टी-२० वर्ल्डकप जिंकलेला नाही. दुसरीकडे पाच वेळा वनडे वर्ल्डकप जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. स्पर्धेचा हा सातवा हंगाम असून वेस्ट इंडिज स्पर्धेचा गतविजेता आहे आणि त्याने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड हे देखील प्रत्येकी एकदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाले आहेत.