आयपीएलच्या सध्याच्या सातव्या हंगामामध्ये साऱ्यांच्याच मुखामध्ये ग्लेन मॅक्सवेल हे एकच नाव आहे. आतापर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाबने जे विजय मिळवले त्यामध्ये मॅक्सवेलच्या तुफानी फलंदाजीचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्याच्यावर फक्त चाहतेच नाहीत, तर क्रिकेटपटूही स्तुतिसुमनांचा वर्षांव करत आहेत. भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागने तर मॅक्सवेल माझ्या आणि गेलपेक्षा आक्रमक असल्याचे म्हटले आहे, तर मॅक्सवेलच्या फलंदाजीमध्ये सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचे मिश्रण पाहायला मिळते, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले आहे.
‘‘मी आक्रमक फलंदाज नाही आणि असलो तरी जास्त आक्रमक नाही. ग्लेन मॅक्सवेल सध्याचा सर्वात आक्रमक फलंदाज आहे. तो आणि मिलर जर असेच खेळत राहिले, तर नक्कीच प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी चांगले दिवस नसतील,’’ असे सेहवाग म्हणाला.
‘‘आयपीएलमधल्या सामन्यांमध्ये मॅक्सवेलकडून अद्भुत फलंदाजी पाहायला मिळते आहे. मॅक्सवेल हा साधारण फलंदाज नाही. त्याच्या फलंदाजीमध्ये सचिन आणि सेहवाग यांचे मिश्रण पाहायला मिळते,’’ असे धोनी म्हणाला.