Dhawal Kulkarni: आगामी रणजी हंगामासाठी मुंबई संघाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गेल्या मोसमातील विजेते आणि विक्रमी ४२ वेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरणाऱ्या मुंबई संघाचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने निवृत्ती जाहीर केली होती. पण आता निवृत्तीनंतर पुन्हा धवल कुलकर्णी मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
मुंबई संघाने आगामी २०२४-२५ हंगामातील सर्व फॉरमॅटमध्ये अनुभवी खेळाडू आणि माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला मार्गदर्शक म्हणून नेमले आहे. धवल कुलकर्णीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव असला तरी देशांतर्गत क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. गेल्या रणजी मोसमात मुंबईला विजय मिळवून देण्यात धवलने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हेही वाचा – T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द
धवल कुलकर्णीला संघाचे मार्गदर्शक नेमताना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नायक म्हणाले, ‘आम्ही धवल कुलकर्णीला आगामी हंगामासाठी गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे.
गेल्या चार रणजी हंगामांवर नजर टाकली तर धवल कुलकर्णीने मुंबई संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी घेतली होती. कुलकर्णीचे योगदान लक्षात घेऊन मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. गेल्या रणजी मोसमात मुंबई संघाला ४२व्यांदा विजय मिळवून देत धवलने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
हेही वाचा – T20 WC 2024: युगांडा संघाची जर्सी पाहून ICCने उचललं मोठं पाऊल, बदल करण्याचे दिले आदेश; काय आहे नेमकं कारण?
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळणाऱ्या धवल कुलकर्णीच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये भारतीय संघासाठी १२ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १९ आणि ३ विकेट्स घेतल्या आहेत. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धवलने ९६ सामने खेळताना २७.१ च्या सरासरीने २८५ विकेट घेतले आहेत. लिस्ट-ए फॉरमॅटमध्ये १३० सामने खेळताना त्याने २२.१३ च्या सरासरीने २२३ विकेट्स घेतल्या आहेत. तर टी-२० फॉरमॅटमध्ये धवल कुलकर्णीने १६२ सामने खेळले असून त्यात त्याने २७.९९ च्या सरासरीने १५४ विकेट्स घेतल्या आहेत.
धवल कुलकर्णी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्सशिवाय पुणे वॉरियर्सकडूनही खेळला आहे. कुलकर्णी भारतीय संघात कायमस्वरूपी स्थान मिळवू शकला नसला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने मुंबईसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.