मुंबई : आम्ही निवडणुकीपुरते हिंदू नसून रामसेवक आहोत, असे परखड प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि अयोध्या दौऱ्यात केले. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्याचा कोणताही विचार किंवा प्रस्ताव नसून विरोधकांकडून अपप्रचार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोटेपणा करून महाड येथे केलेल्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून अवमान केला आहे. त्यांचा निषेध करीत महाराष्ट्र हा अवमान सहन करणार नाही, असे फडणवीस यांनी नमूद केले.

फडणवीस यांनी वाराणसीला जाऊन काशीविश्वेश्वराचे आणि अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. मी राममंदिरासाठीच्या कारसेवेसाठी तीन वेळा आलो होतो. भव्य राममंदिर उभारणीनंतर अयोध्येला जाऊन दर्शन घेण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली, असे फडणवीस यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> कौल जनमताचा : वर्चस्वाच्या वाटेवर…

काशी येथील २०० वर्षे पुरातन मठात आयोजित कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला जेव्हा आवश्यकता पडली, तेव्हा काशीतील विद्वान पंडित गागा भट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. शिंदे, होळकर, पेशवे, भोसले यांनी काशीतील ५० टक्क्यांहून अधिक घाट बांधले. तर अहिल्याबाई होळकर यांनी काशीविश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांच्यानंतर मोदी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या उपक्रमातून काशी व महाराष्ट्राचे नाते समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केसरकरांकडून मनुस्मृतीची भलामण दु:खदायक – भुजबळ

नाशिक : मनुस्मृतीतील श्लोकाची शिक्षणमंत्री दीपक केसरकर भलामण करतात हे दु:खदायक आहे. शालेय शिक्षणात मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करण्याचा प्रस्ताव निषेधार्ह असून यामागे नेमके काय सुरू आहे ते शोधायला हवे, असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी मनुस्मृती ग्रंथावर लोकांचा आक्षेप असला तरी ज्या श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा विचार केला जात आहे, तो श्लोक अतिशय चांगला असल्याचे म्हटले आहे. त्यावर भुजबळांनी आश्चर्य व्यक्त केले. मनुस्मृतीत अतिशय अपमानास्पद लिखाण आहे. महात्मा फुले यांनी त्यावर भाष्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. असे असतानाही अचानक हे श्लोक आणण्याची आवश्यकता का भासली, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांसह इतर संतांचे श्लोक का नाहीत, असे प्रश्न त्यांनी केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनावेळी घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे, असे सांगत भुजबळ यांनी आव्हाड यांची पाठराखण केली. भुजबळ यांनी मनुस्मृतीला विरोध केल्यानंतर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे शुक्रवारी सकाळी ११ वाजता नाशिक येथे प्रतीकात्मक मनुस्मृती ग्रंथाची होळी करण्यात येणार आहे.