परवानगी न घेता आयपीएलचा एलिमिनेटर सामना आयोजित केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. या सामन्याच्या आयोजनाच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याचा सीसीआयचा परवाना का रद्द होऊ नये अशी विचारणा एमसीएने केली आहे. उत्तर देण्यासाठी त्यांना दहा दिवसांचा कालावधी दिला आहे असे एमसीएने स्पष्ट केले.
बीसीसीआयशी संलग्न असलेल्या सीसीआयने २८ मे रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील एलिमिनेटरचा सामना आयोजित केला होता. ही लढत चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार होती. मात्र स्टेडियममधील काही स्टँड्सच्या निर्मित्तीप्रकरणी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन आणि चेन्नई महानगर पालिका यांच्यातील वादामुळे ही लढत चेन्नईऐवजी मुंबईला हलवण्यात आली.