स्थानिक स्पर्धामध्ये भाग घेण्याचा परवाना का काढू नये अशा आशयाची नोटीस मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) क्रिकेट क्लब ऑफ इंडियास (सीसीआय) पाठविली होती मात्र त्याला समाधानकारक न उत्तर  आल्यामुळे एमसीएने पुन्हा सीसीआयला पत्र लिहिण्याचे ठरविले आहे.
या संदर्भात एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये सीसीआयने पाठविलेल्या उत्तराचा आढावा घेण्यात आला. संघटनेचे वरिष्ठ अधिकारी नितीन दलाल यांनी सांगितले, आमच्या कारणे दाखवा नोटिशीला सीसीआयने उत्तर पाठविले आहे मात्र त्यामध्ये भविष्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सामने आयोजित करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र घेण्याविषयी त्यांनी काहीही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा सीसीआयला पत्र लिहिले आहे. त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.
मुंबई संघटनेस मिळालेला आयपीएलचा एक सामना ऐन वेळी सीसीआयला देण्यात आल्यामुळे एमसीएचे पदाधिकारी नाराज झाले. त्यांनी सीसीआयने बीसीसीआयचे कोणतेही सामने आयोजित करण्यापूर्वी एमसीएची परवानगी घेतली पाहिजे, असे एमसीएने सीसीआयला कळविले आहे.
आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील बाद फेरीचा सामना बीसीसीआयने ऐन वेळी वानखेडे स्टेडियमऐवजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला होता.