मायकेल नॉब्स यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने ऑलिम्पिकमध्ये कामगिरी सुधारण्याचे आणि हॉकीला पुन्हा झळाळी देण्याचे स्वप्न पाहिले.. ते अधुरे राहिल्याची जाणीव होताच भारताने नॉब्स यांची मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर नॉब्ज यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर त्यांनी मौन सोडले आणि इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला मुलाखत दिली. यात मी दोन वर्षे भारतीय हॉकी संघाला मेहनत आणि मनापासून प्रशिक्षण दिले असे त्यांनी म्हटले. तसेच या दोन वर्षांत अनेक चांगल्या गोष्टीही अनुभवण्यास मिळाल्या. खेळात कमी-जास्त होतच असते. असेही नॉब्ज पुढे म्हणाले.
स्वत:हून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला की पदावरून काढून टाकण्यात आले? या बद्दल नॉब्ज यांना विचारले असता नॉब्ज म्हणाले,”हा माझा निर्णय होता. गेले काही महिने संघाची कामगिरी खालावली होती. त्यात माझ्या रक्तदाबाच्या कमी-जास्त होण्याच्या त्रासामुळे मला मैदानात जास्तवेळही देता येत नव्हता.” तसेच “जर तुम्हाला आवडत असलेले काम तुम्ही करत असाल पण, तुम्हाला ते कसब आणि स्वास्थ्य या कारणांमुळे करता येत नसेल तर मागे हटणेच योग्य होते. त्यामुळे मी संपुर्णपणे माघार घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन ते तीन महिने पुन्हा बरे होण्यासाठी आराम घेतला. त्यानंतर मीच स्वत:हून राजीनामा देण्याचा विषय भारतीय हॉकी संघाच्या व्यवस्थापकांच्या समोर मांडला.” असेही नॉब्ज यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.