अ‍ॅशेस मालिकेत पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाचा निसटता पराभव झाला. या पराभवाची कारणमीमांसा करीत असतानाच माजी प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला चपराक लगावली आहे. २०१५ पर्यंत असलेल्या कराराचा अचानक भंग करीत पदावरून हकालपट्टी केल्याप्रकरणी ऑर्थर यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे ४ दशलक्ष डॉलर्स एवढय़ा मोठय़ा रकमेची मागणी केली आहे. ऑर्थर यांनी हाती घेतलेल्या न्यायालयीन लढाईनुसार हे स्पष्ट झाले आहे.
ऑर्थर यांच्या या पवित्र्यासह त्यांनी संघात माजलेल्या बेदिलीचाही समाचार घेतला आहे. शेन वॉटसन हा संघाला ग्रासलेला कर्करोग आहे, असे कर्णधार मायकेल क्लार्कला वाटते, असा गौप्यस्फोटही ऑर्थर यांनी केला आहे. क्लार्क आणि वॉटसन यांच्यातील शीतयुद्धाचा बळी ठरल्याचेही ऑर्थर यांनी सांगितले.
क्लार्क आणि वॉटसन यांच्यातील तणावामुळे संघाच्या ऐक्यावर परिणाम झाल्याचे ऑर्थर यांनी म्हटले आहे. २०११ मध्ये प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यापासून या दोघांतील शीतयुद्धाचा फटका बसत असल्याचे ऑर्थर यांनी न्यायालयाला सादर केलेल्या कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे.
वंशभेदाची शिकार झाल्याचा गंभीर आरोपही ऑर्थर यांनी केला आहे. मी दक्षिण आफ्रिकेचा आहे, ऑस्ट्रेलियाची संस्कृती, कार्यपद्धती हे मला कळत नाही म्हणून मी वंशभेदाचा बळी ठरलो, असे ऑर्थर यांनी म्हटले आहे.
भारत दौऱ्यात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वॉटसनसह तीन खेळाडूंना संघातून वगळण्याच्या निर्णयाच्या वेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाठिंबा दिला नसल्याचेही ऑर्थर यांनी पुढे सांगितले.