आक्रमण आणि बचाव यांचा सुरेख मिलाफ साधत कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारांत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ बनलेला माइक हसी कसोटीतून निवृत्त होणार आहे. सिडनी येथे होणारी श्रीलंकेविरुद्धची तिसरी कसोटी हसीची शेवटची कसोटी असणार आहे.
क्रिकेटच्या सखोल ज्ञानामुळे हसीला ‘मिस्टर क्रिकेट’ ही उपाधी मिळाली. प्रचंड सराव, जबरदस्त शारीरिक तंदुरुस्ती, खेळाप्रती अतूट निष्ठा आणि कामगिरीत सातत्य ही हसीच्या कारकिर्दीची ठळक वैशिष्टय़े आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहा हजारांहून अधिक धावा नावावर केल्यानंतर हसीला उशिराने म्हणजे ३०व्या वर्षी कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. मात्र याबाबत कोणतीही तक्रार न करता हसीने या संधीचे सोने केले. ७८ कसोटीत ५१.५२च्या सरासरीने त्याने ६१८३ धावा केल्या आहेत.
‘मला माझ्या कुटुंबीयांना वेळ द्यायचा आहे. घरापासून प्रदीर्घ काळ दूर राहणे मला योग्य वाटत नाही. आगामी काळातील मालिकांसाठी मी मानसिकदृष्टय़ा तयार नाही.
मॅथ्यू हेडन, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, रिकी पॉन्टिंग, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉन यांसारख्या दिग्गजांसोबत खेळण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असल्याचे हसीने सांगितले. ‘हसीच्या निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलियाचे मोठे नुकसान होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयात त्याने सातत्याने योगदान दिले.
हसीचे मैदानावर आणि मैदानाबाहेरील वर्तन नेहमीच आदर्श असे राहिले आहे. त्याच्या या सद्वर्तनामुळेच जगभरातील खेळाडू, पंच-सामनाधिकारी, चाहत्यांचा आदर आणि प्रेम हसीने कमावले होते,’ अशा शब्दांत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅण्ड यांनी हसीच्या कारकिर्दीचा गौरव केला.