कोचीपाठोपाठ रांचीमध्ये भारताने इंग्लिश संघाला हरवून एकदिवसीय क्रिकेटमधील आपला रुबाब दाखवून दिला. झारखंडसारख्या राज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर नेणाऱ्या कप्तान महेंद्रसिंग धोनीला संघ सहकाऱ्यांनी विजयाची भेट दिली. विराट कोहली, युवराज सिंग यांनी चौफेर फटकेबाजी केली, तर भारताच्या सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे रांचीत सांघिक यश मिळविणारा भारतीय संघ मोहालीत आणखी एक करिश्मा दाखविण्यासाठी उत्सुक आहे. चौथा एकदिवसीय सामना जिंकून मालिकेत ३-१ अशी आघाडी घेण्याचा जसा भारताचा इरादा आहे, तसाच मालिकेतील आव्हान टिकविण्यासाठी इंग्लिश संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.
गेल्या काही दिवसांतील खराब कामगिरीचा भूतकाळ मागे टाकून भारतीय संघ आता सावरला आहे. दोन लागोपाठच्या विजयांनंतर युवा खेळाडूंच्या साथीने आता सलग तिसरा विजय आम्ही नोंदवू, अशी धोनीला आशा आहे.
भारताच्या युवा आणि अननुभवी गोलंदाजांनी जबाबदारीपूर्ण गोलंदाजी केली. भारताची आघाडीची फळी वारंवार कोसळल्याचेच चित्र मागील दोन महिने पाहायला मिळत होते. परंतु या दोन सामन्यांत ते बऱ्यापैकी सावरल्याचे आशादायी चित्र पाहायला मिळाले.
पंजाब क्रिकेट असोसिएशन (पीसीए) स्टेडियमवरील लढत जिंकून मालिकेत परतण्याचे दडपण अर्थात पाहुण्या इंग्लिश संघावर असेल. या विजयी कामगिरीचा गांभीर्याने विचार केल्यास काही समस्याही प्रकर्षांने समोर येतात. भारताची सलामीची जोडी अद्याप आपला प्रभाव पाडू शकलेली नाही. गौतम गंभीर सुरुवात तर चांगली करतो, पण ३०च्या आसपास धावा काढून माघारी परततो. मोठी खेळी साकारण्यात त्याला यश येत नाही. दुसरा सलामीवीर अजिंक्य रहाणेलाही सूर गवसलेला नाही. त्यामुळे या मालिकेत भारताला चांगली सलामी लाभलेली नाही. भारताने अजून चेतेश्वर पुजाराला एकाही सामन्यात संधी दिलेली नाही. त्यामुळे बुधवारी रहाणेऐवजी पुजाराला सलामीला पाठविले जाऊ शकते. परंतु भारतीय संघ व्यवस्थापन हा विजयी संघ बदलण्याची चिन्हे अत्यंत कमी आहे. युवा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने आपली चांगलीच छाप पाडली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी यामधील आपली उपयुक्तता त्याने सिद्ध केली आहे.
दुसरीकडे इंग्लिश संघ फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रांतांमध्ये अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. कप्तान अॅलिस्टर कुक कसोटी क्रिकेटप्रमाणे एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा दाखवू शकलेला नाही. घातक फलंदाज केव्हिन पीटरसनसुद्धा अपयशी ठरत आहे. रांचीमध्ये तो संशयास्पद निर्णयाचा बळी ठरला. भारताच्या फिरकीपुढे इंग्लंडचे फलंदाज झगडताना आढळत आहेत. भुवनेश्वर कुमार आणि शामी अहमद यांच्या वेगवान माऱ्यापुढेही इंग्लिश फलंदाजांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, शामी अहमद, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, अमित मिश्रा आणि अशोक दिंडा.
इंग्लंड : अॅलिस्टक कुक (कर्णधार), इयान बेल, केव्हिन पीटरसन, जो रूट, इऑन मॉर्गन, क्रेग किस्वेटर, स्टिव्हन फिन, समित पटेल, ख्रिस वोक्स, जेम्स ट्रेडवेल, जेड डर्नबॅक, टिम ब्रेस्नन, डॅनी ब्रिग्स, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर आणि स्टुअर्ट मीकर.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स आणि स्टार क्रिकेट वाहिनीवर.
सामन्याची वेळ : दुपारी १२ वाजल्यापासून.
धोनीच्या अंगठय़ाला दुखापत
मोहाली : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अंगठय़ाला दुखापत झाल्यामुळे भारतीय चमूत चिंतेचे वातावरण पसरले आहे. संघाच्या सराव सत्रात मनप्रीत गोनीचा चेंडू धोनीच्या अंगठय़ाला लागला. त्यानंतर फिजिओ आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी धोनीच्या अंगठय़ाची पाहणी केली. परंतु त्यानंतरही १० धोनीने फिरकी गोलंदाजांसमवेत फलंदाजीचा सराव केला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2013 रोजी प्रकाशित
भारताचे मिशन मोहाली !
कोचीपाठोपाठ रांचीमध्ये भारताने इंग्लिश संघाला हरवून एकदिवसीय क्रिकेटमधील आपला रुबाब दाखवून दिला. झारखंडसारख्या राज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर नेणाऱ्या कप्तान महेंद्रसिंग धोनीला संघ सहकाऱ्यांनी विजयाची भेट दिली.
First published on: 23-01-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mission mohali