Mitchell Starc Announces T20 Retirement: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने अचानक टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियासाठी ही वाईट बातमी आहे. स्टार्कने टी-२० क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करण्यामागचं कारणही सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलियासाठी ६५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने या फॉरमॅटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. मिचेल स्टार्कने २०१२ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने जून २०२४ मध्ये भारताविरुद्ध शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. स्टार्क २०२१ च्या टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघातही त्याचा समावेश होता.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली, यादरम्यानच मिचेल स्टार्कच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची बातमी आली. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही त्यांच्या सोशल मीडियावर स्टार्कच्या निवृत्तीची माहिती दिली.
मिचेल स्टार्कने अचानक टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा का केली?
मिचेल स्टार्क निवृत्तीची घोषणा करताना म्हणाला आहे, “कसोटी क्रिकेटला नेहमीच प्रथम प्राधान्य दिलं आहे. ऑस्ट्रेलियासाठी खेळलेल्या प्रत्येक टी-२० सामन्यातील प्रत्येक मिनिटाचा मी आनंद घेतला. विशेषतः २०२१ च्या विश्वचषकात, केवळ आम्ही जिंकलो म्हणून नाही तर आम्ही एक अविश्वसनीय संघ होतो आणि त्याहूनही अधिक म्हणजे त्या दरम्यान आम्ही एकत्र घालवलेले क्षण आणि केलेली मजामस्ती यामुळे देखील.”
स्टार्क पुढे म्हणाला, “भारताचा कसोटी दौरा, अॅशेस आणि २०२७ मधील एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करता स्वत:ला फिट ठेवण्याचा आणि त्या मालिकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी स्वत:ला तयार करण्याचा हाच योग्य मार्ग आहे.”
टी-२० क्रिकेटमधील दुसरा यशस्वी गोलंदाज
मिचेल स्टार्क हा त्याच्या कमालीच्या स्विंगसाठी ओळखला जातो. मिचेल स्टार्क हा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या डावखुरा वेगवान गोलंदाजापेक्षा जास्त विकेट्स फक्त फिरकी गोलंदाज अॅडम झम्पाने घेतल्या आहेत. झाम्पाने आतापर्यंत १३० विकेट्स घेतल्या आहेत. स्टार्कच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी म्हणजे २०२१ चा टी-२० विश्वचषक जिंकणं, जे या फॉरमॅटमधील ऑस्ट्रेलियाचं पहिला मोठं विजेतेपद होतं.