चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले आणि ‘स्पिन इज विन’चा प्रत्यय सर्वांनाच आला. पण येथे रंगणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मात्र हे चित्र पाहायला मिळणार नाही. कारण पीसीएची खेळपट्टी ही फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनाही मदत करणारी असली तरी पहिल्या दोन दिवसांमध्ये ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला या खेळपट्टीने नक्कीच दिलासा मिळेल, असे म्हटले जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसरा कसोटी सामना येथे १४ मार्चपासून खेळवण्यात येणार आहे.
पीसीएची खेळपट्टी ही चेन्नई आणि हैदराबादसारखी नक्कीच नसेल. दोन्ही संघांसाठी ही उत्तम खेळपट्टी असून कोणत्याही एका संघाचे या सामन्यात वर्चस्व पाहायला मिळणार नाही. ही खेळपट्टी फलंदाजांबरोबर गोलंदाजांनाही मदत करेल. चेंडू बॅटवर सहजपणे येईल, त्याचबरोबर वेगवान गोलंदाजांनाही या खेळपट्टीची मदत मिळेल. फिरकीपटूंना पहिल्या काही दिवसांमध्ये मदत मिळणार नाही, असे पीसीएचे सचिव एम.पी.पांडव यांनी सांगितले.