Mohammed Siraj Clean Bowled Zak Crawley on Last of Day 3: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करत इंग्लंडसमोर ३७४ धावांचं आव्हान उभं केलं आहे. हे लक्ष्य गाठणं इंग्लंडसाठी फारच कठीण ठरणार आहे आणि त्यासाठी त्यांना इतिहास घडवावा लागणार आहे.

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताला मोठं यश मिळालं. मोहम्मद सिराजने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्राऊलेला त्रिफळाचीत करत इंग्लंडला पहिला मोठा झटका दिला. सिराजने या मालिकेत सातत्याने प्रभावी गोलंदाजी करत भारताच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.

ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावातही सिराजने जबरदस्त कामगिरी करत ४ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या अचूक आणि भेदक माऱ्यामुळे इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आता दुसऱ्या डावातही त्याने क्राऊलेला बाद करून इंग्लंडच्या अडचणी वाढवल्या आहेत.

झॅक क्राऊलेने लॉर्ड्स कसोटीत जसं वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता, तसाच प्रकार अखेरच्या कसोटीतही दिसून आला. सिराज रनअप घेत चेंडू टाकण्यासाठी आला, तेव्हा क्राऊलेने समोरच्या दिशेने हात दाखवत काहीतरी अडचण असल्याचं सांगितलं. जणू काही वेळ वाया जावा आणि पुढचं षटक होऊ नये. हे पाहून क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारतीय खेळाडूंना हसू आवरलं नाही. मात्र, सिराज शांत राहिला आणि भेदक मारा करत त्या षटकात एकही धाव न देता शेवटच्या चेंडूवर झॅक क्राऊलेला त्रिफळाचीत करत भारताला मोठं यश मिळवून दिलं.

क्रॉऊलेसाठी टीम इंडियाने रचला होता सापळा

सिराज आणि टीम इंडियाने यासाठी आधीच सापळा रचला होता. फिल्डिंग करताना डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक उभा करून शॉर्ट बॉल टाकणार असल्याचं भासवलं. पण अचानक सिराजने फुल लेंग्थ चेंडू टाकत मास्टरस्ट्रोक खेळला. चेंडू थेट स्टंप्सवर आदळला आणि क्राऊलेला काही कळण्याआधीच तो बाद झाला. या विकेटमुळे भारताने दिवसाच्या अखेरीस महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवला आणि इंग्लंडच्या अडचणीत भर घातली.

मोहम्मद सिराजने झॅक क्राऊलेला टाकलेला चेंडू इतका वेगवान आणि अचूक होता की टप्पा पडताच तो थेट ऑफ स्टम्पवर आदळला. चेंडू इतक्या वेगात होता की पुढे आलेला क्राऊले पूर्णपणे खाली वाकला असूनही तो चेंडू खेळू शकला नाही. बेल्स हवेत उडाल्या आणि इंग्लंडला मोठा धक्का बसला.

या विकेटमुळे क्राऊले आणि डकेट यांच्यात झालेली अर्धशतकी भागीदारीही खंडित झाली. तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडचा स्कोअर १ बाद ५० धावा इतका आहे, तर भारताने ३२४ धावांची मोठी आघाडी घेतली आहे. आता भारताला विजयासाठी केवळ ९ विकेट्सची गरज आहे.