Mohammed Siraj Reveals Downloaded Photo From Google Inspired him: भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत आपल्या शानदार गोलंदाजीने टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी फक्त ३५ धावांची आवश्यकता होती आणि भारताला ४ विकेट्स घ्यायच्या होत्या. पण मोहम्मद सिराजने दिवसाच्या पहिल्याच षटकापासून विकेट घेण्यास सुरुवात केली आणि आपल्या संघाला ६ धावांनी विजय मिळवून दिला.
भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर फलंदाजाने एक मोठा खुलासा केला आणि ओव्हल कसोटीच्या शेवटच्या दिवसाच्या खेळापूर्वी त्याने गुगलवर एक शब्द लिहिलेला फोटो डाऊनलोड केला आणि त्यामुळे त्याला सामना जिंकण्याचा आत्मविश्वास मिळाला.
ओव्हल कसोटीतील विजयानंतर मोहम्मद सिराज म्हणाला की, शेवटच्या कसोटीत कोणत्याही परिस्थितीतून तो भारताला विजयाकडे नेऊ शकेल असं त्याला वाटत होतं. या रोमांचक सामन्यात सिराजने आपल्या गोलंदाजीने इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडलं आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनेही जिंकली. सामन्यानंतर त्याने जिओ हॉटस्टारवर दिनेश कार्तिकला सांगितलं.
मोहम्मद सिराजने गुगलवरून कोणता फोटो केला डाऊनलोड?
मोहम्मद सिराज म्हणाला, “मला सुरूवातीपासून वाटत होतं की मी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवून देऊ शकतो आणि सकाळी मी तेच केले. मी सकाळी उठलो आणि गुगलवरून एक फोटो डाऊनलोड केला. गुगलवरून Believe (विश्वास) असा लिहिलेला फोटो डाऊनलोड केला आणि स्वत:ला म्हणालो मी हे करू शकतो. माझी एकच रणनिती होती, योग्य लाईनवर गोलंदाजी करत राहायची. मग विकेट मिळते की धावा जातायत याने काही फरक पडत नाही.”
मोहम्मद सिराजने believe शब्द लिहिलेला फोटो त्याने वॉलपेपर ठेवला होता. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सिराजने हा फोटो सर्वांना दाखवला. चौथ्या दिवशी, रविवारी १९ धावांवर हॅरी ब्रुकचा कॅच सोडण्याबद्दल विचारलं असता, सिराज म्हणाला, ‘जेव्हा मी चेंडू पकडला तेव्हा मला वाटलं नव्हतं की मी सीमारेषेला स्पर्श करेन. ब्रुक टी२० शैलीत फलंदाजी करत होता. आम्ही सामन्यात मागे होतो पण देवाचे आभार. मला वाटलं की सामना हाताबाहेर गेला आहे.