Mohammed Siraj Made Mistake Survives Harry Brook: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटी सामना रोमांचक वळणावर येऊन ठेपला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रूक या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत वेगाने धावा केल्या आहेत. यादरम्यान ब्रूकला माघारी धाडण्याची टीम इंडियाकडे सुवर्णसंधी होती, पण मोहम्मद सिराजची एक चूक चांगलीच महागात पडली आहे.
ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवसाची भारताने चांगली सुरूवात केली. बेन डकेट आणि ओली पोप या जोडीला सिराज आणि प्रसिधने माघारी धाडलं. यानंतर हॅरी ब्रूक व जो रूटने मात्र आक्रमक फटके खेळत धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात इंग्लंडने ३ बाद १६४ धाव केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी २१० धावांची गरज आहे.
मोहम्मद सिराजने पाचव्या कसोटीत चांगली गोलंदाजी करत आतापर्यंत एकूण ५ विकेट्स घेतले आहेत. पण सिराजने हॅरी ब्रूकची झेल टिपल्यानंतर मोठी चूक केली आणि तो बाद होण्यापासून वाचला. पहिल्या सत्रात सिराज काही वेळासाठी ड्रेसिंग रूममध्ये गेला होता. यानंतर तो मैदानावर आला आणि सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता.
मोहम्मद सिराजची घोडचूक भारताला पडली महागात
प्रसिध कृष्णा ३५वे षटक टाकत होता. प्रसिधच्या शॉर्ट बॉलवर ब्रूकने मोठा फटका खेळला आणि चेंडू हवेत उंच उडाला. सीमारेषेजवळ सिराज उभा होता त्या दिशेने चेंडू गेला आणि सिराजने चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवून यशस्वीपणे चेंडू टिपला. चेंडू टिपल्यावर संघ जल्लोष करणार इतक्यात त्याचा पाय मागे असलेल्या सीमारेषेवर पडला आणि बाद होण्याऐवजी ब्रूकला षटकार मिळाला.
झेल टिपल्यानंतर सिराज तोल सावरू शकला नाही आणि त्याला अंदाजही नाही आला की एका पावलावर मागे सीमारेषा आहे. सिराजचा तोल जाताच त्याने तोंडावर हात ठेवला आणि निराश झाला. तर तिथे उभा असलेल्या वॉशिंग्टन सुंदरने डोक्यावर हात ठेवला. गोलंदाज प्रसिध कृष्णाने तर हात उंचावत सेलिब्रेशन केलं, पण सिराजचा पाय पाहताच त्यानेही तोंडावर हात ठेवला.
पहिल्या चेंडूवर षटकार मिळाल्यानंतर ब्रूकने त्या षटकात १६ धावा कुटल्या, षटकारानंतर त्याने दोन चौकारही खेचले. हॅरी ब्रूकने पहिल्या सत्रात ३० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३८ धावा केल्या आहेत. तर रूटसह त्याने अर्धशतकी भागीदारी रचत भारताच्या गोलंदाजी विभागाची चांगलीच शाळा घेत आहे.