सहावा ‘मि.वल्र्ड’ कोण ठरणार याची उत्सुकता तमाम शरीरसौष्ठव विश्वाला लागली असून मंगळवारी मुंबईकरांच्या साक्षीने नवा जगज्जेता साऱ्यांना पाहता येईल. भारतीय शरीरसौष्ठवपटू महासंघ आयोजित या स्पर्धेमध्ये एकूण ४५० स्पर्धकांनी सहभाग घेतला असून यापैकी जवळपास २०० स्पर्धक ‘मि.वर्ल्ड’ हा किताब पटकावण्यासाठी सज्ज आहेत. इराणचा संघ सर्वात बलाढय़ वाटत असला तरी भारतीय शरीरसौष्ठवपटू त्यांना तोडीस तोड उत्तर द्यायला तयार आहेत.
भारताला या स्पर्धेत पाच पदकांची अपेक्षा आहे. या पाच जणांमध्ये महाराष्ट्राचा संग्राम चौगुलेचे नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर बॉबी सिंग, हरी प्रसाद, बिपिन पीटर आणि राहुल बिश्त यांच्याकडून भारताला मोठय़ा अपेक्षा आहेत. महाराष्ट्राच्या स्वप्निल नरवणकरसह भारताकडून सुनीत जाधव, बी. महेश्वरन हे नावाजलेले शरीरसौष्ठवपटू आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज आहेत.
भारताच्या राहुल डोईफोडेला कांस्य
मुंबई : ‘मि. वर्ल्ड’ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने पाच पदके कमावली होती. पण दुसऱ्या दिवशी मात्र भारताला एका कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. कनिष्ठ गटाच्या ७० किलो वजनी विभागात राहुलने कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या अॅथलेटिक फिजिक गटात भारताच्या नबजित कुमार दासने चौथा क्रमांक पटकावला.