* ट्विटरकरांचा धोनीच्या कसोटीतील आठवणींना उजाळा
भारतीय संघाच्या कॅप्टनकूल धोनीने मंगळवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती बीसीसीआयला कळवली आणि धोनीच्या या तडकाफडकी निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना धक्काच बसला. कसोटी क्रिकेटला अलविदा करून या पुढील काळात एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करून विश्वचषकासाठी मेहनत घ्यायची असल्याचा इरादा असल्याचे धोनीने सांगितले. धोनीच्या या निर्णयानंतर धोनीने गेल्या दहा वर्षांच्या काळात भारतीय कसोटी क्रिकेटला गाठून दिलेली उंची, कसोटीतील त्याच्या अविस्मरणीय खेळी, त्याच्यासोबतच्या आठवणी, यशस्वी नेतृत्त्व याबद्दल #ThankYouDhoni या हॅशटॅगने टविटरकर धोनीचे आभार व्यक्त करत आहेत. तर काहीजण आगामी विश्वचषकासाठी धोनीला शुभेच्छा देत आहेत.
त्याने शूरपणे नेतृत्त्व केले आणि एका शूराप्रमाणेच अलविदा केले, असे ट्विट अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने केले आहे. तर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने धोनीच्या कसोटी करिअरचे कौतुक करीत त्याच्यासोबत खेळणे नेहमी आनंद देणारे होते. आता २०१५ विश्वचषकच लक्ष्य आहे मित्रा! असे म्हणत विश्वचषकासाठी सचिनने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.