चौथ्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर मात करत मालिकेत आपली पिछाडी २-१ अशी भरुन काढली. त्यामुळे अंतिम सामना हा अधिक चुरशीचा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. मात्र चौथ्या सामन्यात धोनीच्या संथ खेळीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला अशी टीका सर्वच स्तरातून होताना दिसली. सामना संपल्यानंतर निराश झालेला धोनी ड्रेसिंग रुममध्ये एकटाच बसून असल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ मानलं जातं. धोनीच्याच कामगिरीमुळे भारताने तिसरा सामना जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या सामन्यात धोनीने ७८ धावांची खेळी केली होती. याच खेळीमुळे धोनी आंतराष्ट्रीय सामन्यात सर्वाधीक धावा करणारा दुसरा यष्टीरक्षक बनला आहे. धोनीने अॅडम गिलख्रिस्टला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.धोनीने आतापर्यंत ९४९६ धावा केल्या असून पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक कुमार संगकाराच्या १३३४१ धावा झाल्या आहेत.
यानंतर गिलख्रिस्टने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. गिलख्रिस्टने २८२ सामन्यांमध्ये ९४१० धावा काढल्या आहेत, ज्यात १६ शतकं आणि ५३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर धोनीने आपल्या १३ वर्षांच्या करिअरमध्ये १० शतकं आणि ६४ अर्धशतकांच्या सहाय्याने गिलख्रिस्टला मागे टाकलं आहे.