महेंद्रसिंग धोनीसारख्या सक्षम कर्णधाराला एकदिवसीय नेतृत्त्वापासून दूर करणे महागात पडू शकते असा इशारा भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी दिला आहे. विराट कोहलीकडे सर्व प्रकारांत संघाचे नेतृत्त्व द्यावे का याचे उत्तर माझ्याकडे नाही असे कर्स्टन यांनी सांगितले. सर्वच दिग्गज खेळाडू कारकीर्दीच्या अखेरीपर्यंत सर्वोत्तम प्रदर्शन करत असतात. धोनी २०१९ विश्वचषक खेळणार का याविषयी मला कल्पना नाही. परंतु नेतृत्त्वपदावरून त्याला दूर केल्यास एका दिमाखदार प्रदर्शनाला आपण दुरावू.
‘धोनी महान खेळाडू आहे. मी ज्यांच्याबरोबर काम केले आहे त्यांच्यामध्ये धोनी सर्वोत्तम कर्णधार आहे. भारतीय संघाची गेल्या दहा वर्षांतली कामगिरी त्याचे द्योतक आहे. भारताच्या सवरेत्कृष्ट कर्णधारांमध्ये त्याचा समावेश होतो. एकदिवसीय प्रकारातील त्याची कामगिरी थक्क करमारी आहे. अवघड क्रमांकावर फलंदाजाला येऊनही विजयीवीर म्हणून त्याने गाठलेली यशोशिखरे अचंबित करणारी आहेत. त्याला चांगली कामगिरी करताना पाहणे आनंददायी आहे. त्याच्याबरोबर काम करतानाचा अनुभव सुरेख होता. समृद्ध करणारा असा तो अनुभव होता. त्याच्यावर टीका करणाऱ्यांनी आकडेवारी पाहूनच बोलावे’, असे कर्स्टन यांनी सांगितले.