आठवडय़ाची मुलाखत : कृणाल पंडय़ा,  मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू

मुंबई इंडियन्सच्या संघाने दिमाखात बाद फेरीतील स्थान निश्चित तर केले, पण त्याचबरोबर गुणतालिकेतही अव्वल स्थान पटकावले आहे. मुंबईच्या या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे तो अष्टपैलू कृणाल पंडय़ाने. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या खास मुलाखतीत कृणालने मुंबईच्या संघाबाबतचा बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. त्याचबरोबर भारतीय संघातून खेळण्याचे आपले ध्येयही बोलून दाखवले. कृणालशी केलेली ही खास बातचीत.

’  तू एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, पण या मोसमात तुझी फलंदाजी जास्त बहरली नाही, याचे काय कारण वाटते?

मला तसे वाटत नाही. कारण तुम्हाला कधी आणि कोणत्या स्थानावर फलंदाजी करायला संधी मिळते, हे महत्त्वाचे असते. संघाच्या विजयात गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमध्येही योगदान द्यायला मला आवडेल. प्रशिक्षक आणि कर्णधार यांचा माझ्या गुणवत्तेवर विश्वास आहे. त्यामु़ळे जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा नक्कीच संघाच्या विजयात हातभार उचलण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन.

’ तुझे भविष्यातील ध्येय काय आहे?

मी फार पुढचा विचार करत नाही. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावार राहावा, हे माझे ध्येय आहे. पण थोडा पुढचा विचार केला तर माझे भारतीय संघातून खेळण्याचे ध्येय आहे. जर मी सातत्याने कामगिरी करत राहिलो तर मला नक्कीच भारतीय संघातही स्थान मिळेल.

’ सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे, त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये संघाची काय रणनीती आहे?

बाद फेरीत पोहोचल्याने आम्ही समाधानी आहोत, पण संतुष्ट मात्र नाही. संघातील वातावरण आनंददायी आहे, पण आगामी सामन्यांमध्येही विजयी घोडदौड कायम कशी ठेवता येईल, ही आमची रणनीती आहे. आयपीएलचे वेळापत्रक थकवणारे असले तरी सपोर्ट स्टाफने खेळाडूंवर भरपूर मेहनत घेतली आहे. अखेपर्यंत आक्रमक क्रिकेट खेळण्याचेच आम्ही ठरवले आहे.

’ तुमच्या संघात बरेच प्रशिक्षक आहेत, त्यापैकी कोणी तुला जास्त प्रेरणा दिली आहे?

माझ्यासारख्या युवा खेळाडूला मुंबई इंडियन्ससारख्या संघात स्थान मिळाले, यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. मुंबईच्या संघाकडे सर्वोत्तम सपोर्ट स्टाफ आहे, यामध्ये सचिन तेंडुलकरसर, महेला जयवर्धने, शेन बाँड, जाँटी ऱ्होड्स, रॉबिन सिंग यांसारख्या दिग्गज माजी खेळाडूंचा समावेश आहे. या साऱ्यांकडून शिकण्याची प्रत्येकाला सुवर्णसंधी आहे. या सर्व सपोर्ट स्टाफमुळे खेळाचा विकास व्हायला आणि खेळ समजून घ्यायला फार मदत होते.

’ आयपीएलमधील सर्वात कठीण संघ कोणता वाटतो?

माझ्यामध्ये प्रत्येक संघात गुणवान खेळाडू आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळताना कोणत्याही संघाविरुद्ध तुम्ही गाफील राहून चालत नाही. कोणत्याही संघाचा अंदाज येणे फार कठीण आहे.

’  भाऊ हार्दिकची तुला किती मदत होते?

हार्दिक आणि माझ्यामध्ये फक्त भावाचे नाते नाही, तर आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. आम्हा दोघांना एकाच संघात स्थान दिल्याबद्दल मी मुंबईच्या संघाचा आभारी आहे. आम्ही क्रिकेटबद्दल जास्त बोलत नाही, पण एकमेकांच्या कामगिरीचे अवलोकन मात्र प्रत्येक सामन्यानंतर करतो.

’ क्रिकेट जगतातील कोणता खेळाडू तुझ्यासाठी आदर्शवत आहे?

नक्कीच सचिन सर. सचिन सरांनी बऱ्याच जणांना प्रेरणा दिली आहे आणि त्यामधला मी एक आहे. सचिन सर हे स्वत: एक क्रिकेटची ज्ञान देणारी संस्था आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर जेव्हा मला बोलण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांच्याकडून

बरेच काही शिकण्याचा मी प्रयत्न करतो.

’ तुला फलंदाजी जास्त आवडते की गोलंदाजी?

दोन्ही गोष्टी माझ्या आवडीच्याच आहेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये मला योगदान द्यायला आवडते.