भारतीय क्रिकेटमध्ये मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेत, ४१ वेळा विजेतेपद पटकावणारा मुंबईचा संघ आपल्या कारकिर्दीतला ५०० वा सामना खेळणार आहे. आदित्य तरेच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ उद्यापासून वानखेडे मैदानावर बडोद्याशी दोन हात करणार आहे. क गटात मुंबईचे पहिले दोन सामने अनिर्णित राहिले, मात्र त्यानंतर ओडीशाच्या संघाला त्यांच्यात मैदानात मात देत मुंबईने या स्पर्धेत दणक्यात पुनरागमन केलं. यानंतर मुंबई आपल्या कारकिर्दीचा ५०० वा सामना खेळणार आहे, त्यामुळे या सामन्याला एक वेगळचं महत्व प्राप्त झालेलं आहे.

“आमच्या सर्व संघासाठी हा महत्वाचा सामना ठरणार आहे. भारतीय क्रिकेटवर राज्य करणाऱ्या संघाकडून ५०० वा रणजी सामना खेळणं ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. एखाद्या स्पर्धेचं ४१ वेळा विजेतेपद मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. आतापर्यंत अनेक महान खेळाडूंनी मुंबईचं प्रतिनिधीत्व केलं आहे, अशा संघाकडून ५०० वा सामना खेळणं ही माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं”, आदित्य तरेने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणलं आहे.

मागच्या हंगामात रणजी स्पर्धेचं उप-विजेतेपद पटकावणारा मुंबईचा संघ यंदा १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. बडोद्याच्या संघाचं नेतृत्व हे दिपक हुडाच्या हाती आहे. याचसोबत इरफान-युसूफ पठाण हे बंधू बडोद्याच्या संघाचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. तर दुसरीकडे न्यूझीलंडवर मात केल्यानंतर श्रेयस अय्यरचं संघात पुनरागमन झालंय. याचसोबत श्रीलंका दौऱ्याआधी अजिंक्य रहाणेचा हा शेवटचा रणजी सामना असेल. त्यामुळे या सामन्यात मुंबईचं पारडं जड दिसतंय.

५०० व्या रणजी सामन्यासाठी असा असेल मुंबईचा संघ –

आदित्य तरे (कर्णधार), सुर्यकुमार यादव (उप-कर्णधार), अजिंक्य रहाणे, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, अभिषेक नायर, पृथ्वी शॉ, जय बिस्ता, शार्दुल ठाकूर, धवल कुलकर्णी, सुफियान शेख, आकाश पारकर, विजय गोहील, आदित्य धुमाळ आणि रोस्टन डायस.