आयपीएलच्या धर्तीवरील फुटबॉल स्पध्रेचा सलामीचा सामना पुढील वर्षी १८ जानेवारीला नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.
‘‘आयएमजी-रिलायन्स फुटबॉल स्पर्धा १८ जानेवारी ते ३० मार्च २०१४ या कालावधीत होणार आहे. या स्पध्रेचा पहिला सामना मुंबईत होणार आहे. या सामन्याच्या संयोजनाचा मान डी. वाय. पाटील स्टेडियमला मिळण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांत या करारावर स्वाक्षरी होण्याची चिन्हे आहेत,’’ असे सूत्रांकडून समजते.
आयपीएल पद्धतीच्या या स्पध्रेत सहभागी होणाऱ्या आठ फ्रेंचायझींच्या बोली पुढील महिन्यात लावण्यात येणार आहेत. तथापि, खेळाडूंचा (परदेशी खेळाडूंसहित) लिलाव ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.
‘‘सर्व फ्रेंचायझींची क्लब्स म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे आणि व्यावसायिक कंपन्या १० वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची खरेदी करू शकतील,’’ असे सूत्रांकडून समजते.

आयएमजी-रिलायन्स फुटबॉल स्पर्धा अशी असेल
तारखा : ८ जानेवारी ते ३० मार्च २०१४
स्वरूप : साखळी फेरीतील चार अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र
फ्रेंचायझी : ८ संघ. पुणे, मुंबई, चेन्नई, कोलकाता, कोची, गोवा, दिल्ली आणि बंगळुरू ही शहरे संघांसाठी निश्चित करण्यात आली आहेत, तर गुवाहाटी आणि हैदराबाद यांना राखीव ठेवण्यात आले आहे.
संघांची रचना : २२ खेळाडूंचा प्रत्येक संघात समावेश, यापैकी एका विशेष खेळाडूसहित १० विदेशी खेळाडू आवश्यक.
प्रत्येक संघात ८ भारतीय खेळाडू आणि २३-वर्षांखालील वयोगटातील ४ स्थानिक खेळाडू.
विशेष खेळाडू : १२ ते १५ खेळाडूंना हा दर्जा देण्यात येईल.सामन्याचे स्वरूप : सर्वसामान्य फुटबॉल सामन्याप्रमाणे ९० मिनिटांचा खेळ

फुटबॉल लीगमुळे भारताला चांगले दिवस येतील -मॉर्गन
मुंबई : फुटबॉल लीग इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) तुलनेत ५० टक्के प्रभावी झाली तरी भारतीय फुटबॉलसाठी ते उपयुक्त असेल, असे मत ट्रेव्हर मॉर्गन यांनी व्यक्त केले. आयएमजी-रिलायन्स लीग पर्वाच्या एक महिन्याच्या सराव शिबिराचे प्रमुख म्हणून मॉर्गन यांनी सूत्रे स्वीकारली, त्यावेळी ते बोलत होते.
‘‘आयपीएलने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. पायाभूत पातळीवर आयपीएलने आपला ठसा उमटवला आहे. असा प्रभाव फुटबॉल लीगने टाकल्यास खेळासाठी ते उपयुक्त असेल. आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे अशी चाहत्यांची इच्छा आहे,’’ असे इस्ट बंगाल संघाचे माजी प्रशिक्षक मॉर्गन यांनी पुढे सांगितले.