गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर घसरण झालेल्या बलाढय़ मुंबईला आता अटीतटीची झुंज द्यावी लागणार आहे. शनिवारपासून राजकोट येथील एससीए स्टेडियमवर सुरू होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात मुंबईला सौराष्ट्रशी दोन हात करावे लागतील.
अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ कागदावर मजबूत वाटत असला तरी याआधीच्या सामन्यात मुंबईला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नही. पण रवींद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा हे सौराष्ट्रचे दोन अव्वल खेळाडू अनुपस्थित असल्यामुळे मुंबईला पूर्ण गुण वसूल करण्याची संधी मिळणार आहे. जडेजा आणि पुजारा सध्या नागपूर येथे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या मोसमात सौराष्ट्रच्या यशात जडेजाने गोलंदाजी आणि फलंदाजीत उपयुक्त योगदान दिले आहे. त्याने पाच सामन्यांत दोन त्रिशतकी खेळींसह ७९४ धावा फटकावताना २४ बळी मिळवले आहेत.
वासिम जाफर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, इक्बाल अब्दुल्ला, अभिषेक नायर आणि अंकित चव्हाणसारखे तगडे खेळाडू मुंबईकडे आहेत. रोहितने पंजाबविरुद्ध द्विशतक तर अंकितने नऊ बळी मिळवले होते. ‘‘हा सामना आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे या सामन्यात पूर्ण गुण वसूल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मुंबईला या मोसमात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा सौराष्ट्रला मिळणार असला तरी मुंबई संघातील रोहित आणि अंकितसारखे खेळाडू आता फॉर्मात आले आहेत,’’ असे आगरकरने सांगितले. रोहित, जाफर आणि रहाणे यांना फलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलावी लागणार असून आगरकर आणि धवल कुलकर्णी यांच्यावर वेगवान माऱ्याची भिस्त असेल. त्यांना फिरकीपटू अब्दुल्ला आणि अंकित यांची साथ मिळू शकते. मुंबईचे आतापर्यंत ११ तर सौराष्ट्रचे १५ गुण झाले आहेत.
प्रतिस्पर्धी संघ :
मुंबई : अजित आगरकर (कर्णधार), वासिम जाफर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, धवल कुलकर्णी, कौस्तुभ पवार, अभिषेक नायर, सूर्यकुमार यादव, हिकेन शाह, आदित्य तरे, इक्बाल अब्दुल्ला, जावेद खान, शार्दुल ठाकूर, अंकित चव्हाण आणि सागर गोरिवले.
सौराष्ट्र : जयदेव शाह (कर्णधार), सितान्शू कोटक, सागर जोगियानी, अर्पित वसवदा, भूषण चौहान, चिराग पाठक, शौर्य शांडिल्य, संदीप मणियार, शेल्डन जॅक्सन, सिद्धार्थ त्रिवेदी, कमलेश मकवाना, जयदेव उनाडकट, कुलदीप रावल, बालकृष्ण जडेजा आणि नयन दोषी.
संग्रहित लेख, दिनांक 15th Dec 2012 रोजी प्रकाशित
मुंबईसाठी महत्त्वाची लढाई
गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर घसरण झालेल्या बलाढय़ मुंबईला आता अटीतटीची झुंज द्यावी लागणार आहे. शनिवारपासून राजकोट येथील एससीए स्टेडियमवर सुरू होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात मुंबईला सौराष्ट्रशी दोन हात करावे लागतील.

First published on: 15-12-2012 at 02:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai to take on saurashtra in group a ranji match