‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी आपली प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हिचा खून केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याच्यावर शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या दंडाधिकारी न्यायालयाने खूनाचा गुन्हा दाखल केला.
न्यायाधीश डेस्मंड हेअर यांच्यासमोर सुनावणी सुरू असताना पिस्टोरियस मोठय़ाने रडत होता. गुरुवारी रिव्हाला आपल्या घरी गोळ्या घालून ठार मारल्याबद्दल हेअर यांनी पिस्टोरियसवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून त्याच्या घराची तपासणी सुरू असून गुरुवारी पिस्टोरियसच्या डीएनए, रक्तासह अन्य चाचण्या घेण्यात आल्या. गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी सकाळी ४ वाजता पोलिसांना बोलावले. मात्र बाथरूमच्या दरवाज्यातून पिस्टोरियसने गोळ्या झाडल्याचा दावा ‘बील्ड’ या दैनिकाने केला आहे. पिस्टोरियसने आपल्या बंदुकीतून चार गोळ्या झाडल्यानंतर रिव्हाच्या डोक्यातून आणि हातातून रक्त वाहत होते. पण तिचा जागीच मृत्यू झाला.
‘‘आम्ही सर्वच जण वाईट परिस्थितीतून जात आहोत. पिस्टोरियस सध्या पोलिसांच्या हवाली असून आता हे प्रकरण प्रशासनाकडे गेले आहे,’’ असे पिस्टोरियसचे वडील हेन्के यांनी सांगितले. देखणी प्रेयसी, वेगवान गाडय़ा आणि बंदुकीमुळे पिस्टोरियसच्या खाजगी आयुष्याबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित राहत असे. पोलिसही आता त्याच्या घरात घडलेल्या याआधीच्या प्रकरणांची चौकशी करत आहेत. ‘‘पिस्टोरियस आणि वाद हे समीकरणच बनले होते. पण तो सेलिब्रेटी असल्यामुळे आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो,’’ असे त्याच्या शेजारी असलेल्या काइल वूड याने सांगितले.