अँडी मरेने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवरील विलगीकरण पूर्ण होणे कठीण असल्यामुळे हा निर्णय त्याने घेतला आहे.

एक आठवडय़ाआधी मेलबर्नला जाण्यासाठी विमानात बसण्यापूर्वी आलेला करोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे मरेने सांगितले. ‘‘विलगीकरणाच्या प्रक्रियेतून योग्य मार्ग काढण्यासाठी माझी टेनिस ऑस्ट्रेलियाशी सातत्याने बोलणी सुरू होती. परंतु मी अपयशी ठरलो. माझ्या आवडत्या ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत खेळू न शकल्याची खंत मला वाटते आहे,’’ असे मरेने सांगितले.

मरे सध्या जागतिक टेनिस क्रमवारीत १२३व्या स्थानावर आहे. तीन ग्रँडस्लॅम विजेत्या मरेने आतापर्यंत पाच वेळा (२०१०, २०११, २०१३, २०१५ आणि २०१६)ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. जानेवारीत मरेने फ्लोरिडातील डेलरे बीच खुल्या टेनिस स्पर्धेतूनही माघार घेतली होती. ८ फेब्रुवारीपासून मेलबर्न पार्कवर हंगामातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेला प्रारंभ होत असून, कोणताही खेळाडू, प्रशिक्षक किंवा अधिकाऱ्यांना ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावर १४ दिवसांचे विलगीकरण बंधनकारक आहे.