उत्तेजक चाचणीत दोषी सापडलेला मुंबईचा कुस्तीपटू नरसिंग यादवचे ऑलिम्पिकवारीचे भवितव्य राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) नेमलेल्या शिस्तपालन समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. मात्र हा अहवाल सादर होण्यास किमान आठवडा ते दोन महिने इतका वेळ लागणार असल्यामुळे परिणामी नरसिंगची रिओ ऑलिम्पिकवारी हुकण्याचीच दाट शक्यता आहे. रिओत गेल्यानंतर जर नरसिंग दोषी सापडला तर देशाची बदनामी होईल. या पाश्र्वभूमीवर पूर्ण चौकशीअंती तो दोषमुक्त आढळला, तरच त्याला सहभागाची परवानगी दिली जाईल, अशी भूमिका केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑलिम्पिकमध्ये ७४ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणारा नरसिंग बंदी घालण्यात आलेल्या उत्तेजकांचे सेवन केल्यामुळे दोषी आढळल्यामुळे देशातील क्रीडा क्षेत्रात खळबळ माजली आहे. नरसिंगवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोएल यांनी सांगितले. भारतीय कुस्ती संघ सोमवारी (२५ जुलैला) मध्यरात्री जॉर्जिया येथे प्रशिक्षण आणि सराव सामन्यांसाठी निघणार आहे; परंतु नव्या वादात अडकलेला नरसिंग या संघासोबत जाऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे क्रीडामंत्र्यांनी भारतीय ऑलिम्पिक पथकातील खेळाडूंची संख्या स्पष्ट करताना १२० ऐवजी ११९ इतकीच मांडली आहे.

नरसिंगप्रकरणी राजधानीत वेगाने चक्रे फिरत आहेत. ऑलिम्पिकसंदर्भातील एका कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आलेल्या गोएल यांचा प्रसारमाध्यमांनी नरसिंग संदर्भात प्रश्न विचारून पिच्छा पुरवला. याबाबत ते म्हणाले, ‘‘एखादा खेळाडू उत्तेजक घेतल्याचे सिद्ध होते, तेव्हा शिस्तपालन समिती अशा प्रकारच्या कोणत्याही घटनांवर आपला अहवाल देते आणि खेळाडूला संधी देते. त्याचे दोन नमुने असतात, यापैकी एक नमुना चाचणी त्यांच्यासमोरच केली जाते. नरसिंगच्या या चाचणीत उत्तेजकांचे अंश सापडले, तेव्हा समितीने त्यांना या संदर्भात खुलासा करण्यास सांगितले. नरसिंगने आपले जे काही स्पष्टीकरण दिले असेल, तर समिती त्यावर चौकशी करील.’’

‘‘आता शास्त्र आणि तपासणींचे तंत्र इतके आधुनिक झाले आहे की, जी नाडा चाचणी घेते, तो अहवाल जागतिक उत्तेजकविरोधी संस्था (वाडा) यांच्यापर्यंत पोहोचतो. या सर्व गोष्टींमध्ये पारदर्शकता राहावी, अशी देशवासीयांची इच्छा आहे. कोणताही खेळाडू रिओत जाऊन परत यावा अशी आमची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे देशातच याचा निर्णय झाल्यास योग्य ठरेल. आम्हाला सर्वाना त्याच्याकडून पदकाची अपेक्षा आहे,’’ असे गोएल यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत ‘नाडा’ स्वतंत्रपणे कार्यरत आहे. त्यामुळे शिस्तपालन समितीमध्ये कोण आहे, याबाबत मलाही कोणतीही माहिती नाही. वैद्यकीय अधिकारी, क्रीडापटू यांचा त्यात समावेश असतो. कोणताही गैरप्रकार होत असेल, तर त्याचा शोध घेण्यासाठी देशातील कायदा सक्षम आहे. मात्र या प्रकरणी ‘नाडा’च्या समितीचा जो अहवाल येईल, त्याच आधारे आम्ही पुढे जाऊ. तिथे अधिक किंवा वजा करण्याचा प्रश्नच उरत नाही.’’

भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साइ) महासंचालक इंजेट श्रीनिवास यांनी शिस्तपालन समितीचा अहवाल येण्यास बराच वेळ लागेल. या संदर्भातील प्रक्रिया अतिशय मोठी असते, असे सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narsingh yadav is an open and shut case sports authority of india
First published on: 26-07-2016 at 03:47 IST