World Athletics Championship Tokyo 2025: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या पदरी निराशा पडली आहे. नीरज चोप्राची कामगिरी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत फारशी चांगली राहिली नाही. तर कॅरेबियन बेटावरील दोन देशांच्या खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावलं आहे. तर अमेरिकेच्या खेळाडूने कांस्यपदक पटकावलं. याशिवाय भारताचा दुसरा भालाफेकपटू सचिन यादव चौथ्या क्रमांकावर राहिला आहे.

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केशॉर्न वॉलकोट याने ८८.१६ मी. थ्रोसह सुवर्णपदक, ग्रेनाडाच्या अँडरसनने पीटर्सने आपला कमालीचा फॉर्म कायम ठेवत ८७.३८ मी. सह रौप्य पदक तर अमेरिकेच्या कर्टिस थॉम्पसनने ८६.६७ मी. सह कांस्यपदक पटकावलं आहे. तर भारताचा दुसरा भालाफेकपटू सचिन यादव ८६.२७ मी. सह चौथ्या स्थानी राहिल्याने थोडक्यात पदकापासून लांब राहिला.

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ८४.०३ मी. च्या सर्वाधिक थ्रो सह आठव्या स्थानी राहिला. नीरज चोप्रा पात्रता फेरीत ८४.८५ मीटरच्या पहिल्याच थ्रोसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अंतिम फेरीत त्याने पहिल्या प्रयत्नात ८३.६५ मी. थ्रो केला. दुसऱ्या प्रयत्नात ८४.०३ मी. तिसरा थ्रो फाऊल ठरला. तर चौथ्या प्रयत्नात त्याने ८२.८६ मी.थ्रो केला. तर पाचवा थ्रो देखील फाऊल ठरला.

भारताच्या सचिन यादवचं ४० मीटरमुळे पदक हुकलं

भारताचा दुसरा भालाफेकपटू सचिन यादवने ८६.२७ मीटर भालाफेक करत नीरज चोप्राला मागे टाकलं. त्याने नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम सारख्या दिग्गजांना मागे टाकत आपल्या नावाचा डंका वाजवला. सचिन यादव कमालीच्या थ्रोसह चौथ्या क्रमांकावर राहिला. सचिनने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीने सर्वांची मनं जिंकली.