Neeraj Chopra on Radhika Yadav: हरियाणाची टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी हत्या केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. क्रीडा क्षेत्रालाही यामुळे धक्का बसला. हरियाणातून अनेक खेळाडू आजवर पुढे आलेले आहेत. महिला खेळाडूही यात मागे नाहीत. अवघ्या २५ व्या वर्षी राधिकाने टेनिसमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. मात्र कुटुंबात टेनिस आणि सोशल मीडिया या विषयांवर वाद निर्माण झाल्यानंतर वडिलांनी राधिकाची हत्या केली.
गुरुग्राम न्यायालयाने शुक्रवारी राधिकाचे वडील दीपक यादव यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यांनी स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे.
राधिका यादवच्या मृत्यूमुळे हरियाणाच्या क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रातील खेळाडू आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करत आहेत. तसेच हरियाणाचा रहिवासी आणि भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानेही याबद्दल मत व्यक्त केले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा नीरज चोप्रा हरियाणातील खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहे.
ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने म्हटले की, हरियाणातील महिला क्रीडापटूंनी देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे. महिला क्रीडापटूंना आदर्श मानून त्यांचे अनुकरण करायला हवे.
“या घटनेपूर्वी मी काही लोकांशी बोलत होतो. हरियाणातील महिला क्रीडपटूंनी देशात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. देश त्यांच्याकडे आदराने पाहतो. कुटुंबामध्ये आपण एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे. तसेच महिला खेळाडूंचा आदर राखत त्यांना आदर्श मानले पाहिजे”, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राने दिल्याचे एनडीटीव्हीने म्हटले आहे.
गुरूवारी (१० जून) सकाळी गुरुग्राममधील सुशांत लोक परिसरातील निवासस्थानी वडील दीपक यादव यांनी राधिकावर गोळीबार केला. तीन गोळ्या लागल्यामुळे राधिकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेनंतर दीपक यादव यांचे पिस्तूल जप्त केले आहे. तसेच दीपक यादव यांनी गुन्हा कबूल केला आहे. मात्र हत्येमागचा खरा उद्देश काय होता? याचा तपास केला जात आहे.