तीन वेळा जेतेपदाने हुलकावणी दिलेला नेदरलँड्सचा संघ सध्या विश्वचषकाच्या जेतेपदासाठी आसुसलेला आहे. ब गटात स्पेन, चिली आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांचा पाडाव केल्यानंतर नेदरलँड्सचा संघ आता बाद फेरीतील मेक्सिकोविरुद्धच्या बाद फेरीच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या फेरीत सर्वाधिक गोल करणारा नेदरलँड्स वि. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक गुइलेर्मो ओचोआ असा हा सामना रंगणार आहे. गतविजेत्या स्पेनचा वचपा काढल्यानंतर नेदरलँड्स संघ पहिल्यावहिल्या विश्वचषक जेतेपदाची चव चाखण्यासाठी आतुर आहे.
गतविजेत्या स्पेनचा ५-१ असा मानहानीकारक पराभव करताना महत्त्वपूर्ण दोन गोल झळकावणारा रॉबिन व्हॅन पर्सी बंदीमुळे चिलीविरुद्धच्या सामन्याला मुकला होता. आता तो संघात परतल्यामुळे नेदरलँड्सचा संघ मेक्सिकोविरुद्ध किती गोलफरकाने विजय मिळवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरीकडे मेक्सिकोने क्रोएशिया आणि कॅमेरूनवर विजय मिळवले आणि गुइलोर्मो ओचोआच्या सुरेख कामगिरीमुळे जगातील सर्वोत्तम संघ समजल्या जाणाऱ्या ब्राझीलला गोलशून्य बरोबरीत रोखले होते.
आर्येन रॉबेन, वेस्ले श्नायडर आणि व्हॅन पर्सी ही सर्वोत्तम आक्रमक फळी नेदरलँड्सकडे असली तरी त्यांचा बचाव काहीसा ढिसाळ मानला जात आहे. त्यामुळेच साखळी फेरीत १० गोल करणाऱ्या नेदरलँड्सने तीन गोल स्वीकारले होते. ३०व्या वर्षीही रॉबेन जबरदस्त फॉर्मात असून दोन सामन्यांत त्याने तीन गोल लगावले होते. श्नायडरला अद्याप सूर गवसला नसला तरी नेदरलँड्सच्या विजयात त्याने दिलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे.
मेक्सिकोचे प्रशिक्षक मिग्युएल हेरेरा सध्या ‘सातवे आसमाँपर’ आहेत. जीवनातील सुरेख क्षण मी अनुभवत आहे, असे त्यांनी म्हटले होते. राफेल मार्केझ हा सलग चौथ्या विश्वचषकात कर्णधाराच्या भूमिकेत असून त्याच्याकडून मेक्सिकोला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मेक्सिकोने गेल्या पाचही वेळा विश्वचषकाच्या अंतिम १६ जणांमध्ये धडक मारली आहे. आता ते उपान्त्यपूर्व फेरीचे दार ठोठावतात का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
लक्षवेधी खेळाडू
रॉबिन व्हॅन पर्सी  (नेदरलँड्स) : स्पेनविरुद्ध रॉबिन व्हॅन पर्सीने केलेला गोल सर्वाची वाहवा मिळवून गेला. आतपर्यंत तब्बल तीन गोल करत व्हॅन पर्सीने नेदरलँड्सच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. ड्रिब्लिंगचे सुरेख कौशल्य आणि चेंडूला गोलजाळ्यापर्यंत नेण्याची क्षमता असलेला व्हॅन पर्सी नेदरलँड्सच्या ‘मिशन वर्ल्डकप’चा प्रमुख आधारस्तंभ आहे. गोलसाहाय्यकाची भूमिकाही त्याने आतापर्यंत चोखपणे पार पाडली आहे.
जेवियर हेर्नाडेझ(मेक्सिको) : जेवियर हेर्नाडेझने आतापर्यंत मँचेस्टर युनायटेडसाठी आघाडीवीराची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. मेक्सिकोलाही त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. गोल करण्याची तीव्र इच्छा, चेंडूवर नियंत्रण मिळवण्याचे सुरेख कौशल्य, कोणतेही दडपण न घेता खेळ करण्याची शैली, बचावपटूंच्या चकवून चेंडूला पुढे नेण्याची क्षमता, गोल करण्यात पटाईत आणि प्रतिस्पध्र्यावर आक्रमक हल्ले चढवणे ही जेवियरच्या खेळाची खासियत आहे.
गोलपोस्ट
स्पर्धेतील अन्य संघांप्रमाणेच आम्ही नेदरलँड्सला कडवी लढत देणार आहोत. नेदरलँड्स हा जेतेपदासाठी दावेदार समजला जाणारा संघ आहे. ते आम्हाला भीत नाहीत, हीच आमच्यासाठी प्रेरणादायी बाब आहे. नेदरलँड्स संघ संगणकाप्रमाणे खेळ करत असून त्यांच्याकडे एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत.   
 – गुइलेर्मो ओचोआ, मेक्सिकोचा गोलरक्षक

आम्हाला आमची ताकद माहित आहे. आर्येन रॉबेन आणि रॉबिन व्हॅन पर्सी हे दोन दिग्गज खेळाडू आमच्याकडे आहेत. वेस्ले श्नायडर हा जगातील सर्वोत्तम खेळाडू त्यांच्या संघात आहे. मेक्सिकोची भिस्त झेवियर हेर्नाडेझवर असून त्याला रोखण्यासाठी आम्ही रणनीती आखली आहे.                                           
डिर्क क्युयट, नेदरलँड्सचा बचावपटू

सामना क्र. ५१: नेदरलँड्स वि. मेक्सिको
स्थळ : इस्टाडियो कॅस्टेलाओ, फोर्टालेझा  *वेळ : रात्री ९.३०वा.पासून
आमने-सामने
सामना : १ बरोबरी : १