विजय हजारे क्रिकेट स्पर्धेच्या नवा हंगामाला आजपासून प्रारंभ

मुंबई : देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धापैकी एक मानल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या नव्या हंगामाला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. या पर्वात गतविजेता मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ हे तीन संघ कशी कामगिरी करतात, याकडे महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.

२५ ऑक्टोबपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदा ३८ संघ सहभागी होत असून एकूण १६९ सामने खेळले जाणार आहेत. तमिळनाडूने सर्वाधिक पाच वेळ या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.

मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी नुकताच भारतीय संघातील स्थान बळकट करणाऱ्या श्रेयस अय्यरकडे मुंबईचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे. परंतु काही आठवडय़ांपूर्वी भारताला युवा आशिया चषक उंचावून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या १९ वर्षीय अथर्व अंकोलेकर यंदा खास आकर्षण ठरणार आहे. ५० षटकांच्या सामन्यांच्या या स्पर्धेत मुंबईची सलामीच्या सामन्यात सौराष्ट्रशी गाठ पडणार

आहे. भारताला गतवर्षी न्यूझीलंडमध्ये झालेला युवा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार पृथ्वी शॉ मात्र निलंबनामुळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

केदार जाधवच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा पहिल्या लढतीत बडोद्याशी सामना होणार आहे. महाराष्ट्राच्या संघात राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, स्वप्निल गुगळे यांसारख्या कौशल्यवान खेळाडूंचा समावेश आहे.

सलग दोन वेळ रणजी करंडकावर नाव कोरणाऱ्या विदर्भासमोर पहिल्या सामन्यात गतउपविजेत्या दिल्लीचे आव्हान असणार आहे. नियमित कर्णधार फैझ फझलच्या अनुपस्थितीत यंदा अनुभवी वसिम जाफर विदर्भाचे नेतृत्व करणार आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाज उमेश यादव, आदित्य सरवटे, अक्षय वाडकर असे गुणी खेळाडू विदर्भाच्या ताफ्यात आहेत.

* सामन्यांची वेळ : सकाळी ९ वाजल्यापासून

२००२ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या १७ पर्वापैकी मुंबईने तीन वेळा विजेतेपद मिळवले असून महाराष्ट्र आणि विदर्भाला अद्याप एकदाही अशी कामगिरी करता आलेली नाही.

यंदा प्रथमच चंडीगडचा संघ विजय हजारे स्पर्धेत स्वतंत्रपणे सहभागी होणार आहे.