न्यूझीलंड क्रिकेट नंतर, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने देखील पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. दौऱ्याचा पहिला सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार होता, त्याच दिवशी न्यूझीलंड क्रिकेटने सुरक्षेचे कारण देत संपूर्ण दौरा रद्द केला होता. सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड आणि इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर आता आणखी एक आंतरराष्ट्रीय दौरा धोक्यात आल्याचे दिसत आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंड महिला संघ आज इंग्लंड विरुद्ध लीसेस्टर येथे तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्यादरम्यान अशा धमक्या आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. न्यूझीलंड क्रिकेटने याला दुजोरा दिला आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा एक मेल आला आहे. ही धमकी किती गांभीर्याने घेतली जाईल, हे त्याच्या तपासानंतरच कळेल, मात्र धमकीनंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे असे न्यूझीलंड क्रिकेटने म्हटले आहे.

धमकीच्या ईमेलनंतर इंग्लंडच्या संघाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर खेळाडूंनी सरावही केला नाही. तसेच, सुरक्षा दलांना तपासासाठी पाचारण करण्यात आले. मात्र, क्रिकेट चाहत्यांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे की या धमक्यांनंतरही आजचा सामना दोन्ही संघांमध्ये होणार आहे. खबरदारी म्हणून संघांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या महिला संघात एकूण ५ एकदिवसीय सामने होणार आहेत. दोन सामने झाले आहेत, ज्यात इंग्लंडचा संघ २-० ने पुढे आहे. इंग्लंड संघाने ब्रिस्टल आणि वॉर्सेस्टर येथे खेळलेले सामने जिंकले. आजचा सामना लेसेस्टरमध्ये होईल. त्याचवेळी, चौथा सामना २३ सप्टेंबरला डर्बीमध्ये खेळला जाईल आणि पाचवा सामना २६ सप्टेंबरला कॅंटबरीमध्ये खेळला जाईल.

दरम्यान, यापूर्वी न्यूझीलंडच्या पुरुष क्रिकेट संघाने त्यांचा पाकिस्तान दौरा रद्द केला होता. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही जाहीर केले की, ते आपला पुरुष आणि महिला संघ पाकिस्तानला पाठवणार नाहीत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand women england tour security tightened after bomb threat abn
First published on: 21-09-2021 at 13:09 IST