सामन्याआधी फक्त ३६ तास आधी दाखल झालेल्या नायजेरियाच्या संघाने कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेत अननुभवी ताहितीचा ६-१ने धुव्वा उडवला. बोनसच्या मुद्यावरून वाद झाल्याने नायजेरियाच्या संघाचे ब्राझिलमध्ये उशिराने आगमन झाले. याचा फटका त्यांच्या कामगिरीवर होईल अशी भीती त्यांच्या चाहत्यांना होती, मात्र थकव्याची कोणतीही लक्षणे न दर्शवता नायजेरियाने आपले वर्चस्व सिद्ध केले. या विजयासह ‘ब’ गटात नायजेरियाने स्पेनला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. उवा इल्डरसन इचिईजिलेने सामना सुरू झाल्यावर लगेचच गोल करत नायजेरियाचे खाते उघडले. त्यानंतर नमदी ओडुयामादीने १०व्या आणि २६व्या मिनिटाला गोल करत नायजेरियाची आघाडी बळकट केली. यानंतर ताहितीच्या बचावपटूंनी नायजेरियाच्या आक्रमणाला थोपवले. मात्र मध्यंतरानंतर ताहितीतर्फे जोनाथन तेहायूने गोल केला. मात्र त्यानंतर थोडय़ाच वेळात त्याच्या स्वयंगोलमुळे नायजेरियाच्या नावावर ४ गोल झाले. ओडुयामादीने ७६व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. उवा इल्डरसन इचिईलिजेने गोल करत नायजेरियाच्या दिमाखदार विजयावर शिक्कामोर्तब केले.