महाराष्ट्राच्या निखिलेश ताभाणे याने ५०व्या राष्ट्रीय स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या डिव्हिजन प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली. यशवंत नगर, विरार येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कबीर चोटरानी याने ८ ते १० वर्षांखालील मुलांच्या गटात इनलाईन प्रकारात जेतेपद पटकावले. चैतन्य आफळे याने महाराष्ट्राला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने १०-१२ वर्षांखालील मुलांच्या गटात क्वाड्स प्रकारात सुवर्णपदक मिळवले. मुलींच्या १६ वर्षांखालील गटात वर्षां पुराणिक, निलाशा हस्तांथर, प्रज्ञा हस्तांथर यांच्या कर्नाटक संघाने सुवर्णपदक प्राप्त केले. प्रीती इंगळे, शिवानी शेट्टी, धनश्री सुराणा यांच्या महाराष्ट्राच्या संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या १६ वर्षांखालील रिले प्रकारात आकाश आराध्य, बाबू धनाशू आणि जी. व्ही. राघवेंद्र यांनी कर्नाकटला सांघिक सुवर्णपदक मिळवून दिले. आंध्र प्रदेशच्या संघाने रौप्यपदक पटकावले.