महाराष्ट्रातील खेळाडूंच्या विकासासाठी महाकबड्डी लीगची योजना पाच वर्षांपूर्वी आखण्यात आली होती. या k10गौरवशाली पर्वाला प्रारंभ झाल्याचा आनंद राज्यातील प्रत्येक कबड्डी खेळाडू आणि प्रशासकाला होत आहे. प्रो-कबड्डी लीगला आमचा अजिबात विरोध नाही. त्यामुळे प्रो-कबड्डीला आव्हान निर्माण करण्यासाठी महाकबड्डी असे समजण्याची मुळीच आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर यांनी दिले आहे. वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या संकुलात शुक्रवारपासून महाकबड्डी लीगच्या पहिल्या पर्वाला प्रारंभ झाला. यानिमित्ताने पाथ्रीकर यांच्याशी केलेली खास बातचीत-

महाकबड्डी लीगच्या नव्या पर्वाविषयी काय सांगाल?
महाराष्ट्राच्या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, त्यांची आर्थिक उन्नत्ती व्हावी आणि पालकांमध्ये कबड्डीविषयक जागृती निर्माण करण्याच्या हेतूने सुरू झालेल्या महाकबड्डीचे वैभवशाली पर्व सुरू झाले आहे. पाच वर्षांपूर्वी मोहन भावसार कार्याध्यक्ष असताना महाकबड्डीबाबत चर्चा झाली होती, परंतु निर्णय झाला नव्हता. दरम्यानच्या काळात एक समिती स्थापन करून या संकल्पनेची योजना आखण्यात आली. मॅक्स गॉडविकचे सिद्धार्थ मेहता आणि अर्जुनवीर शांताराम जाधव यांच्या प्रयत्नांमुळे ती प्रत्यक्षात येत आहे.

महाकबड्डी लीगचे आर्थिक गणित कसे सांभाळण्यात आले?
आर्थिक गणित मुळीच अवघड नव्हते. संघांवर गुंतवणूक करणाऱ्या फ्रेंचायझींनी या स्पध्रेच्या संकल्पनेची पूर्ण माहिती घेतली आणि मग ते तयार झाले. खरे तर पुरुषांच्या संघांसाठी फ्रेंचायझींनी जास्त किंमत मोजली होती. परंतु लिलावामध्ये मात्र महिला खेळाडूंना जास्त बोली लागल्याचे दिसून आले. कारण महिलांसाठीची पहिलीच लीग देशात सुरू झाली आहे.

प्रो-कबड्डी लीगला आव्हान म्हणून महाकबड्डी लीग असे म्हणता येईल का?
महाकबड्डी लीगचा प्रो-कबड्डी लीगशी अजिबात संबंध नाही. महाकबड्डी ही महाराष्ट्रातल्या खेळाडूंसाठी आहे. आम्ही राज्यातील सर्व जिल्ह्यांशी संपर्क साधून ही योजना आखली आहे. प्रो-कबड्डीचे सामने महाराष्ट्राच्या हद्दीत होऊनसुद्धा त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचे टाळले होते. पण आमचा प्रो-कबड्डीला अजिबात विरोध नाही. कारण महाराष्ट्रातील खेळाडूंना त्या व्यासपीठावर संधी मिळते आणि भरघोस आर्थिक उत्पन्न मिळते.

महाकबड्डी लीगने भविष्याची वाटचाल करताना कोणती धोरणे निश्चित केली आहेत?
मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र या कबड्डीमधील अविकसित जिल्ह्यांमध्ये महाकबड्डीच्या माध्यमातून खेळ कसा पोहोचेल, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल. याचप्रमाणे सध्या प्रत्येक संघात १० खेळाडूंचा समावेश आहे, याऐवजी १२ खेळाडू असतील. महाकबड्डीत गुंतवणूक करण्यासाठी आता आणखी काही फ्रेंचायझी उत्सुक आहेत. त्यामुळे गरज भासल्यास प्रत्येक विभागात चार संघ वाढवण्यात येतील. याशिवाय महाकबड्डी लीगचा दुसरा हंगाम दुबईत घेण्याबाबत आम्ही गांभीर्याने योजना आखत आहोत.

महाकबड्डीच्या कालखंडात छत्तीसगढला पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा होते आहे. संघटनेचे प्रमुख खेळाडूंबाबत काय धोरण असेल?
या स्पध्रेच्या तारखा आधी महाकबड्डीला कुठेही अडचणीच्या ठरत नव्हत्या. परंतु भारतीय हौशी कबड्डी महासंघाने महाकबड्डी लीगमुळे जाणीवपूर्वक तारखांमध्ये बदल केला आहे. मात्र आमचे प्राधान्य महाकबड्डीलाच असेल. कारण महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा राज्यातील खेळाडूंसाठीचा उपक्रम आहे. त्यामुळे महाकबड्डीत न खेळणाऱ्या खेळाडूंचे संघ आम्ही पश्चिम विभागीय स्पध्रेसाठी निश्चितपणे पाठवू.