‘‘भारतीय ‘अ’ संघात माझी निवड झाली, याचा अतिशय आनंद झाला आहे. माझ्याकडून होत असलेली कामगिरी अशीच चालू राहावी आणि भारतीय संघात पुनरागमन व्हावे, हीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. प्रत्येक क्रिकेटपटूप्रमाणे भारतीय संघातून खेळण्याचे स्वप्न मी जोपासले आहे,’’ असे मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर याने सांगितले. याचप्रमाणे रविवारी आयपीएलच्या सहाव्या पर्वाच्या लिलावात नायरला ६ लाख ७५ हजार डॉलर्सचा भाव मिळाला आणि पुणे वॉरियर्सने खरेदी केले. याबाबत नायरने सांगितले की, ‘‘या बातमीने मला फार आनंद झाला आहे, परंतु पुण्यासाठी मी जेव्हा चांगला खेळून संघाला जिंकून देईन, तेव्हा मला अधिक आनंद होईल.’’
आठवडय़ाभरापूर्वीच मुंबईने आपले स्थानिक क्रिकेटमधील वर्चस्व अबाधित राखताना चाळिसाव्या जेतेपदावर नाव कोरले. मुंबईच्या जेतेपदात नायरचा सिंहाचा वाटा आहे. या मोसमातील ११ सामन्यांत ९९.६६च्या सरासरीने ९६६ धावांचा ‘अभिषेक’ करणाऱ्या नायरच्या खात्यावर यंदा तीन शतके आणि आठ अर्धशतकेही जमा होती. रणजी हंगाम संपल्यावर राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सराव सामन्यांसाठी अध्यक्षीय संघ आणि भारत ‘अ’ संघाची घोषणा केली. या दोन्ही संघांत अभिषेकला स्थान देण्यात आले नव्हते. मात्र दोन दिवसांनी निवड समितीला आपली चूक उमगली आणि नायरचा भारत ‘अ’ संघात समावेश करण्यात आला. याविषयी नायर म्हणाला, ‘‘भारत ‘अ’ संघात स्थान मिळाल्याचे नक्कीच समाधान आहे. आता मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा माझा प्रयत्न असेल.’’ यंदाच्या एकंदर रणजी मोसमाविषयी आणि कारकीर्दीविषयी नायरशी केलेली ही खास बातचीत-
मुंबईला चाळिसावे ऐतिहासिक विजेतेपद मिळवून देणाऱ्या या हंगामाचे वर्णन तू कसे करशील?
– माझ्यासाठी यंदाचा रणजी हंगाम एखाद्या स्वप्नाप्रमाणेच होता. मी मोसमाआधी जे लक्ष्य निश्चित केले होते, त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी माझ्याकडून झाली, याचा मला अभिमान आहे. जे ठरविले होते ते करू शकलो, यामुळे मी अत्यंत खूश आहे.
२००८-०९च्या रणजी क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्यात तुझे शतक अवघ्या एका धावेने हुकले होते, त्याबद्दल काय सांगशील?
– रणजी करंडक स्पध्रेचा तो अंतिम सामना होता. त्यामुळे तोही वेगळा अनुभव होता. ९९ धावांवर बाद झालेल्या कुणालाही त्याबद्दल वाईट वाटणे स्वाभाविक आहे; परंतु संघ जिंकला आणि मुंबईला विजेतेपद मिळाले, हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे होते.
काही वर्षांपूर्वी तू भारताचे प्रतिनिधित्व केले आहेस. तो अनुभव तुझ्यासाठी कसा होता?
– मी २००९मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, परंतु तो अनुभव माझ्यासाठी फारसा चांगला नव्हता. भारताचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा संघातून जेव्हा वगळण्यात आले, तेव्हा मला भरपूर शिकायला मिळाले. आपण काय गमावले आहे, याची तीव्रतेने जाणीव झाली.
तुझी फलंदाजीची जी शैली आहे ती निराळी आहे, याविषयी काय सांगशील?
– बालपणापासून मी वेगळ्या पद्धतीनेच फलंदाजी करत आलो आहे. मी माझ्या शैलीत कधीही बदल केला नाही. तिचे दिसणे कसे असेल यापेक्षा माझी कामगिरी अधिकाधिक चांगली कशी होईल, याकडे मी गांभीर्याने पाहतो.
तुला आजवरच्या प्रवासात कुणाचे विशेष मार्गदर्शन लाभले?
– नरेश चुरी आणि प्रवीण अमरे यांचे मला चांगले मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे अनेक अनुभवी खेळाडूंचेही मार्गदर्शन मला मिळाले आहे. मुंबईच्या संघाकडून खेळताना अमोल मुझुमदार, साईराज बहुतुले आणि विनोद कांबळी यांनीही मला चांगले धडे दिले.
क्रिकेटमधील तुझा आदर्श कोण? त्याच्याकडून तुला कोणता कानमंत्र मिळाला?
– माझा आदर्श अर्थातच सचिन तेंडुलकर. सचिनच्या अनुभवातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळते. सचिन सोबत असणे हीच भावना आम्हा खेळाडूंसाठी सुखावणारी असते.
कुटुंबाकडून तुला क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडविताना कसे सहकार्य मिळते?
– क्रिकेटपटू म्हणून घडताना मला सर्वात मोठे मानसिक पाठबळ होते, ते कुटुंबाचे. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात आणि यशात कुटुंबाचा वाटा मोठा आहे.
खेळाडूचे नाव देश संघ किंमत (डॉलर्स)
ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलिया मुंबई इंडियन्स १०.०० लाख
अजंठा मेंडीस श्रीलंका पुणे वॉरियर्स ७.२५ लाख
केन रिचर्डसन ऑस्ट्रेलिया पुणे वॉरियर्स ०७.०० लाख
अभिषेक नायर भारत पुणे वॉरियर्स ०६.७५ लाख
थिसारा परेरा श्रीलंका हैदराबाद सनराइजस ०६.७५ लाख
ख्रिस मॉरिस दक्षिण आफ्रिका चेन्नई सुपरकिंग्ज ०६.२५ लाख
सचित्र सेनानायके श्रीलंका कोलकाता नाइटरायडर्स ०६.२५ लाख
दिर्क नॅनीस ऑस्ट्रेलिया चेन्नई सुपरकिंग्ज ०६.०० लाख
जयदेव उनाडकत भारत रॉयल चॅलेंजर्स ०५.२५ लाख
मनप्रीत गोनी भारत किंग्ज इलेव्हन पंजाब ०५.०० लाख
जोहान बोथा दक्षिण आफ्रिका दिल्ली डेअरडेव्हिल्स ०४.५० लाख
नाथन कुल्टरनील ऑस्ट्रेलिया मुंबई इंडियन्स ०४.५० लाख
डॅरेन सॅमी वेस्ट इंडिज हैदराबाद सनराइजर्स ०४.२५ लाख
जेम्स फॉल्कनर ऑस्ट्रेलिया राजस्थान रॉयल्स ०४.०० लाख
मायकेल क्लार्क ऑस्ट्रेलिया पुणे वॉरियर्स ०४.०० लाख
रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलिया मुंबई इंडियन्स ०४.०० लाख
रुद्रप्रतापसिंग भारत रॉयल चॅलेंजर्स ०४.०० लाख
मोझेस हेन्रिक ऑस्ट्रेलिया रॉयल चॅलेंजर्स ०३.०० लाख
ल्युक पॉमरबाश ऑस्ट्रेलिया किंग्ज इलेव्हन पंजाब ०३.०० लाख
रवी रामपाल वेस्ट इंडिज रॉयल चॅलेंजर्स ०२.९० लाख
जेसी रायडर न्यूझीलंड दिल्ली डेअरडेव्हिल्स ०२.६० लाख
फिडेल एडवर्ड्स वेस्ट इंडिज राजस्थान रॉयल्स ०२.१० लाख
पंकजसिंग भारत रॉयल चॅलेंजर्स ०१.५० लाख
फिलिप ह्य़ुजेस ऑस्ट्रेलिया मुंबई इंडियन्स ०१.०० लाख
नाथन मॅककुलम न्यूझीलंड हैदराबाद सनराइजर्स ०१.०० लाख
क्लिंन्ट मॅके ऑस्ट्रेलिया हैदराबाद सनराइजर्स ०१.०० लाख
डॅन ख्रिस्तियन ऑस्ट्रेलिया रॉयल चॅलेंजर्स ०१.०० लाख
सुदीप त्यागी भारत हैदराबाद सनराइजर्स ०१.०० लाख
रियान मॅक्लेरेन दक्षिण आफ्रिका कोलकाता नाइटरायडर्स ५० हजार
जेकब ओराम न्यूझीलंड मुंबई इंडियन्स ५० हजार
ख्रिस्तोफर बर्नवेल वेस्ट इंडिज रॉयल चॅलेंजर्स ५० हजार
जीवन मेंडीस श्रीलंका दिल्ली डेअरडेव्हिल्स ५० हजार
क्विटॉन डीकोक दक्षिण आफ्रिका हैदराबाद सनराइजर्स २० हजार
कुशल परेरा श्रीलंका राजस्थान रॉयल्स २० हजार
अकिला दानंजया श्रीलंका चेन्नई सुपरकिंग्ज २० हजार
बेन लॉघिन ऑस्ट्रेलिया चेन्नई सुपरकिंग्ज २० हजार
जेसन होल्डर वेस्ट इंडिज चेन्नई सुपरकिंग्ज २० हजार
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2013 रोजी प्रकाशित
‘आता भारतीय संघात पुनरागमन, हीच इच्छा!’
‘‘भारतीय ‘अ’ संघात माझी निवड झाली, याचा अतिशय आनंद झाला आहे. माझ्याकडून होत असलेली कामगिरी अशीच चालू राहावी आणि भारतीय संघात पुनरागमन व्हावे, हीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे.
First published on: 04-02-2013 at 01:32 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now come back in indian team is the desire