अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज आणि कुशल मेंडिस यांनी साकारलेल्या दमदार अर्धशतकांना वेगवान गोलंदाजांची अप्रतिम साथ लाभल्यामुळे श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बांगलादेशचा १२२ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह श्रीलंकेने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या नुवान कुलसेकराला त्यांनी हा विजय समर्पित केला. पण या विजयाचं सेलिब्रेशन करताना एक विचित्र गोष्ट घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीलंकेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करून सामना आणि मालिका जिंकली. त्यानंतर उत्तम केल्याचे बक्षीस म्हणून खेळाडूला बाईक देण्यात आली. या बाईकवर फेरफटका मारण्यासाठी कुशल मेंडिस आणि शेहान जयसूर्या हे दोघे निघाले. मैदानातच त्यांना बाईकवरून एक चक्कर मारायची होती. सुरक्षा कड्याच्या आतल्या बाजूला त्यांनी बाईकवर फेरी मारण्यास सुरुवात केली आणि नेमकी त्यांची बाईक घसरली व दोघेही मैदानावरच पडले. त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, श्रीलंकेने दिलेल्या २९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव ३६ षटकांत १७२ धावांत संपुष्टात आला. ८७ धावांची झुंजार खेळी साकारणाऱ्या मॅथ्यूजला सामनावीर, तसेच मालिकेत दोन अर्धशतकांसह एकूण १८७ धावा केल्यामुळे मालिकावीर पुरस्कारानेसुद्धा गौरवण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना मॅथ्यूज आणि मेंडिस (५४) यांनी चौथ्या गडय़ासाठी १०१ धावांची भागीदारी रचल्यामुळे श्रीलंकेने ५० षटकांत ८ बाद २९४ धावांपर्यंत मजल मारली. दिमुथ करुणारत्ने (४६) आणि कुशल परेरा (४२) यांनीसुद्धा बहुमूल्य योगदान दिले.

प्रत्युत्तरादाखल दसुन शनका, कसुन रजिथा आणि लहिरु कुमारा या वेगवान त्रिमूर्तीने सात फलंदाजांना माघारी पाठवल्यामुळे बांगलादेशचा डाव १७२ धावांत संपुष्टात आला. सौम्य सरकार (६९) आणि तैजुल इस्लाम (नाबाद ३९) यांना वगळता एकाही बांगलादेशच्या फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odi series sri lanka bangladesh kusal mendis shehan jayasuriya bike sleep ground video vjb
First published on: 02-08-2019 at 15:10 IST