ज्ञानेश भुरे, लोकसत्ता 

पुणे : बचावातील कमालीच्या संघर्षांनंतर निर्णायक क्षणात आक्रमणात चमक दाखवत ओडिशा जगरनॉट्स संघाने रविवारी पहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचे विजेतेपद पटकावले. म्हाळुंगे बालेवाडी येथे झालेल्या या स्पर्धेतील अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात ओडिशाने तेलुगु योद्धाजचे आव्हान ४६-४५ असे अवघ्या एका गुणाने परतवून लावले.

संपूर्ण सामना बचावाच्या आघाडीवर खेळला गेला असला, तरी निर्णायक क्षणी ‘स्काय डाईव्ह’चा गुण मोलाचा ठरला आणि सुरज लांडेने ओडिशाला विजय मिळवून दिला. सुरजने एकूण ९ गुणांची कमाई केली. त्याला रोहन शिंगाडेची साथ मिळाली. तेलुगु संघाकडून प्रतिक वाईकर, अवधूत पाटील चांगले खेळले. 

विजेत्या ओडिशा संघाला रोख १ कोटी, उपविजेत्या तेलुगु संघाला ५० लाख पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार रामजी कश्यपला मिळाला. सर्वोत्तम आक्रमक म्हणून अभिनंदन पाटील, तर सर्वोत्तम बचावपटू म्हणून दीपक माधवला गौरविण्यात आले.

अंतिम फेरीच्या लढतीत ओडिशा आणि तेलुगु या दोन्ही संघांनी बचावावर भर दिला. पूर्वार्धात दोन्ही संघाच्या पहिल्या दोन्ही तुकडय़ांनी बचावाच्या आघाडीवर चोख भूमिका बजावताना संघाची बाजू लावून धरली होती. ओडिशाने आक्रमणात एक पाऊल पुढे राखत मध्यंतराला २३-२० अशी आघाडी मिळवली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या डावातही ओडिशाच्या पहिल्या तुकडीने सहा गुणांची कमाई केली होती. यामध्ये सुरजचा मोठा वाटा राहिला. त्यानंतर मात्र तेलुगुच्या आक्रमणाला धार आली. वजीर म्हणून उतरलेल्या सचिन भार्गवच्या ‘पॉवर-प्ले’मधील आक्रमणाने तेलुगुची बाजू भक्कम झाली. त्यामुळे त्यांना ४७-२७ अशी आघाडी मिळवता आली आणि ओडिशासमोर १५ गुणांचे आव्हान ठेवता आले. तेलुगुच्या प्रत्येक तुकडीने बचाव भक्कम राखण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी ओडिशाचे आक्रमण भारी पडले आणि त्यांनी अखेरच्या क्षणी ‘स्काय डाईव्ह’चा गुण वसूल करत एका गुणाने बाजी मारली.