ऑलिम्पिक पदकविजेत्या हेलन मारोऊलिसची भावना

भारतात आता परिस्थिती बदलते आहे. लोकांनी दृष्टिकोन बदलून खेळाडूंना पाठिंबा दिला तर कुस्तीमध्ये भारतालाही अमेरिकेसारखी पदके जिंकता येतील, असे अमेरिकेची अव्वल महिला कुस्तीपटू हेलन मारोऊलिसने सांगितले.

प्रो कुस्ती लीगच्या तिसऱ्या हंगामाला येत्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतामध्ये आलेली हेलन आपला जीवनसंघर्ष मांडताना म्हणाली, ‘‘वयाच्या सातव्या वर्षी मला कुस्ती खेळायची होती; पण त्यामध्ये कारकीर्द घडवता येणार नाही, हे माझ्या पालकांना वाटत होते. त्यांनी मला कुस्ती सोडायला लावली. कुस्ती म्हणजे पुरुषांचा खेळ, ही त्यांची भावना होती. त्यांनी मला दुसरा खेळ खेळायला सांगितले; पण काही महिन्यांत महिला कुस्तीचा चांगला प्रसार झाला. पालकांनी कुस्ती खेळायला परवानगी दिली. क्रीडाविश्वात माझ्या कुस्तीची दखल घेतली जावी, ही मनात ईर्षां होती. पराभव आणि दुखापतींचे अडथळे येत होतेच; पण प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्यांच्यावर मला मात करता आली. अमेरिकेसारख्या देशाला महिला कुस्तीमध्ये मी पहिले पदक जिंकवून दिले आणि सार्थक झाल्याची भावना मनात आली. भारतातही काही वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती. ती आता बदलते आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेलनने रिओ ऑलिम्पिकमध्ये ५३ किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेतही तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. हेलन अमेरिकेची असली तरी तिला भारताच्या कुस्तीपटूंबद्दल चांगली माहिती आहे.

‘‘सुशील कुमारसारखा अव्वल कुस्तीपटू भारताकडे आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकची कामगिरी साऱ्यांनाच माहिती आहे. या दोघांनीही नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

पटकावले होते. सध्या त्यांचा फॉर्म चांगला आहे. त्यांच्या ऑलिम्पिक पदकामुळे भारतामध्ये कुस्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कुस्तीमध्ये भारताचे भविष्य उज्ज्वल आहे,’’ असे हेलन म्हणाली.