पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) सर्व सहा ऑलिम्पिक कोटा विजेत्या कुस्तीगिरांना निवड चाचणीपासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिक संघनिवडीसाठी आता निवड चाचणीचे आयोजन केले जाणार नसले, तरी हंगेरी येथे जूनमध्ये होणारी मानांकन स्पर्धा आणि त्यानंतर होणाऱ्या सराव शिबिरात भारतीय कुस्तीगिरांची तंदुरुस्ती आणि लय याचा आढावा घेतला जाईल.

निवड चाचणी न घेण्याचा निर्णय या सध्याच्या परिस्थितीचा विचार करून घेण्यात आला असून हा पायंडा पाडता कामा नये, असे ‘डब्ल्यूएफआय’ने म्हटले आहे. मानांकन स्पर्धा आणि त्यानंतर सराव शिबिरात कोणत्याही ऑलिम्पिक कोटा विजेत्या कुस्तीगिराची तंदुरुस्ती अपेक्षेप्रमाणे नसल्यास निवड चाचणी घेऊन त्याची/तिची जागा घेण्यासाठी नव्या कुस्तीगिराची निवड केली जाईल, असेही ‘डब्ल्यूएफआय’ने स्पष्ट केले आहे. पॅरिस ऑलिम्पिककरिता खेळाडूंची नावे पाठवण्यासाठी ८ जुलैपर्यंतची मुदत आहे.

हेही वाचा >>>शेन वॉट्सनने RCB च्या खेळाडू अन् चाहत्यांची मागितली माफी, २०१६ च्या IPL फायनलबाबत मोठं वक्तव्य

भारतासाठी पुरुषांमध्ये अमन सेहरावत (५७ किलो वजनी गट), तर महिलांमध्ये विनेश फोगट (५० किलो), अंतिम पंघाल (५३ किलो), अंशू मलिक (५७ किलो), निशा दहिया (६८ किलो) आणि रीतिका हुडा (७६ किलो) यांनी ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. त्यांनी आपली तंदुरुस्ती आणि लय सिद्ध केल्यास त्यांना थेट पॅरिसचे तिकीट मिळणार आहे.

या कुस्तीगिरांनी निवड चाचणी न घेण्याचे ‘डब्ल्यूएफआय’ला आवाहन केले होते. निवड चाचणीत खेळावे लागल्यास दुखापतींचा धोका उद्भवू शकेल असे या कुस्तीगिरांचे म्हणणे होते. पॅरिस ऑलिम्पिकला २६ जुलैपासून सुरुवात होणार असल्याने या कुस्तीगिरांना सरावासाठी फारसा वेळही मिळणार नाही. या सगळ्याचा विचार करूनच संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील ‘डब्ल्यूएफआय’ निवड समितीने निवड चाचणी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olympic quota winning wrestlers exempted from selection test sport news amy