आर्यलड संघाच्या गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांमध्ये खराब व दिशाहीन गोलंदाजी केली, त्यामुळेच ओमान संघाने त्यांच्यावर दोन गडी व दोन चेंडू राखून सनसनाटी विजय मिळविला आणि विश्वचषक ट्वेन्टी२० स्पर्धेतील पात्रता फेरीत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.

आर्यलड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १५४ धावा केल्या. त्यामध्ये गॅरी विल्सन (३८), विल्यम पोर्टरफिल्ड व पॉल स्टर्लिग (प्रत्येकी २९) यांनी केलेल्या शैलीदार फलंदाजीचा महत्त्वाचा वाटा होता. ओमानकडून मुनीस अन्सारीने प्रभावी गोलंदाजी करीत तीन बळी घेतले. ओमान संघाच्या झीशान मकसूद (३६), खवर अली (३४), जतिंदरसिंग (२४) व आमेर अली (३२) यांनी शैलीदार व आत्मविश्वासाने खेळ करीत संघाला १९.४ षटकांत विजय मिळवून दिला. ओमानच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करीत आर्यलडच्या फलंदाजांना मोठी भागादारी करण्यापासून रोखले. त्यामुळेच आर्यलडला जेमतेम दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. पोर्टरफिल्डने तीन चौकार व एक षटकारासह २९ धावा केल्या. स्टर्लिग याने केलेल्या २९ धावांमध्ये सहा चौकारांचा समावेश होता. ओमानतर्फे अन्सारीने ३७ धावांमध्ये तीन बळी घेतले.

मकसूद व खवर यांनी चौफेर फटकेबाजी करीत ओमानला दमदार सुरुवात करून दिली होती. त्यांनी सलामीसाठी ८.३ षटकांत ६९ धावा जमविल्या.  ही जोडी फुटल्यानंतर ओमानची धावगती मंदावली. परंतु जतिंदरसिंग (२४) याच्या साथीत अमीर अली याने ४.१ षटकांत ४७ धावांची भर घातली आणि सामन्यातील रंगत वाढविली. अमंीर याने पाच चौकार व एका षटकारासह ३२ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

आर्यलड २० षटकांत ५ बाद १५४ (विल्यम पोर्टरफिल्ड २९, पॉल स्टर्लिग २९, गॅरी विल्सन ३८, मुनीस अन्सारी ३/३७) पराभूत विरूद्ध ओमान : १९.४ षटकांत ८ बाद १५७ (झीशान मकसूद ३६, खवर अली ३४, अमीर अली ३२, अँडी मॅक्ब्राईन २/१५)