चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पध्रेतून पुन्हा एकदा रिक्त हस्ते मायदेशी परतण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढवली आहे. कांस्यपदकासाठीच्या लढतीत रविवारी पाकिस्तानने भारताचा ३-२ असा पराभव केला. या स्पध्रेत आठ वर्षांनी पाकिस्तानला हे पदक जिंकता आले आहे.
पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान (२२व्या मिनिटाला), शफाकत रसूल (४१व्या) आणि मोहम्मद आतीक (६६ व्या) यांनी गोल केले. याचप्रमाणे भारताकडून व्ही. रघुनाथ (७व्या) आणि रुपिंदर पाल सिंग (७०व्या) पेनल्टी कॉर्नर्सद्वारे गोल झळकावले.
तीन वेळा चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा जिंकणाऱ्या पाकिस्तानने २००४मध्ये लाहोर येथे अखेरचे पदक जिंकले होते. त्यावेळीही भारताला नमवून पाकिस्तानने कांस्यपदकावरच नाव कोरले होते. पाकिस्तानने २००२, २००३, २००४ आणि आता २०१२मध्ये भारताला हरवून कांस्यपदक जिंकले.