बंगळूरु : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये ‘प्ले-ऑफ’ गाठण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जला अखेरच्या षटकात १७ धावांत रोखणे आवश्यक, समोर महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा यांसारखे नामांकित फलंदाज. या आव्हानात्मक परिस्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिसने चेंडू डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालकडे सोपवला. पहिल्या चेंडूवर धोनीने उत्तुंग षटकार मारल्यानंतर दयाल दडपणाखाली होता. मात्र, त्याने या दडपणाचा खुबीने सामना करताना धोनीला बाद केले आणि मग जडेजाला रोखत बंगळूरुला ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यामुळे सामनावीराच्या पुरस्कारासाठी डय़ूप्लेसिसची निवड झाल्यानंतर त्याने हा पुरस्कार दयालला समर्पित केला.
डय़ूप्लेसिसचे (३९ चेंडूंत ५४ धावा) अप्रतिम अर्धशतक आणि त्याला अन्य फलंदाजांची मिळालेली साथ यामुळे बंगळूरुने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २१८ अशी धावसंख्या उभारली. मात्र, चेन्नईला ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश करण्यासाठी २०० धावाही पुरेशा ठरणार होत्या, तर त्यांना यापेक्षा कमी धावांत रोखल्यास बंगळूरुचा संघ आगेकूच करणार होता. अखेर चेन्नईला २० षटकांत ७ बाद १९१ धावाच करता आल्याने बंगळूरुने ‘प्ले-ऑफ’मधील स्थान निश्चित केले. डय़ूप्लेसिसने अर्धशतकी खेळी करण्यासह दोन उत्कृष्ट झेलही पकडले. त्यामुळे त्याची सामनावीराच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
हेही वाचा >>>RCBच्या विजयानंतर बेभान झालेल्या चाहत्यांचे गैरवर्तन, CSKच्या फॅन्सशी धक्काबुक्की केल्याचा VIDEO व्हायरल
‘‘मी हा पुरस्कार यश दयालला समर्पित करू इच्छितो. तू चेंडूचा वेग कमी करण्याचा प्रयत्न कर, असे मी त्याला सांगितले होते. त्याने अप्रतिम गोलंदाजी केली,’’ असे डय़ूप्लेसिस म्हणाला. ‘‘या सामन्यासाठी स्टेडियममध्ये खूप छान वातावरण निर्माण झाले होते. हंगामातील अखेरचा साखळी सामना घरच्या प्रेक्षकांसमोर खेळायला मिळाल्याचा आनंद आहे. पावसाचा खेळपट्टीला फटका बसण्याची भीती होती, पण तसे झाले नाही,’’ असे डय़ूप्लेसिसने नमूद केले.
‘प्ले-ऑफ’ प्रवेशासाठी बंगळूरुने चेन्नईला २०० धावांत रोखणे गरजेचे होते. मात्र, आम्ही चेन्नईला केवळ १७५ धावांत रोखण्याचे ध्येय बाळगले होते, असे डय़ूप्लेसिसने सांगितले.
सामना जिंकून दिल्याचा आनंद – दयाल
गेल्या वर्षीच्या ‘आयपीएल’मधील एका सामन्यात यश दयालच्या गोलंदाजीवर सलग पाच षटकार खेचत रिंकू सिंहने कोलकाताला सामना जिंकून दिला होता. त्यानंतर दयालचा आत्मविश्वास खालावला होता. गेल्या हंगामानंतर गुजरात टायटन्सने दयालला संघमुक्त केले आणि यंदाच्या हंगामापूर्वी बंगळूरुने त्याला ५ कोटी रुपयांत संघात समाविष्ट करून घेतले. त्याने या हंगामात चांगली कामगिरी केली असली, तरी शनिवारी चेन्नईविरुद्ध त्याची खरी कसोटी लागली. ‘प्ले-ऑफ’ प्रवेशासाठी चेन्नईला अखेरच्या षटकात १७ धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर धोनीने षटकार मारला. त्यानंतर दयालच्या गेल्या वर्षीच्या कटू आठवणी जाग्या झाल्या. ‘‘मला जुने सगळे आठवू लागले होते. मात्र, मी स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवला. मी धावफलक न बघता योजनेनुसार गोलंदाजीचा प्रयत्न केला. मी आमच्या संघाला सामना जिंकून देऊ शकलो याचा आनंद आहे,’’ असे दयाल म्हणाला. दयालने अखेरच्या पाच चेंडूंत केवळ एक धाव दिली आणि धोनीला बादही केले.