पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (PCB) भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) द्विपक्षीय मालिकेबाबतच्या सहमती पत्राचा (एमओयू) आदर न करण्याचा आरोप केला होता. याबाबतची PCB ची याचिका ICC च्या dispute पॅनलने फेटाळून लावली आणि PCB ला दणका दिला. ICC च्या या निर्णयाचे BCCI चे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी स्वागत केले आहे. नुकसान भरपाई मागण्यापेक्षा पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवाव्यात, असा टोला अनुराग ठाकूर यांनी लगावला आहे.

ICC च्या तक्रार निवारण समितीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो कारण PCB ने केलेला नुकसान भरपाईचा दावा हा तथ्यहीन होता. त्यामुळे अखेर त्यांचा दावा फेटाळण्यात आला आणि भारताला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्याची गरज लागली नाही. त्यामुळे आता पाकिस्तानने अशा प्रकारचे दावे न करता दोन देशांमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, असे मत त्यांनी PTIकडे व्यक्त केले.

मंगळवारी ICC ने या दाव्याबाबत आपल्या अधिकृत ट्विटवर लिहिले होते की, ‘तक्रार निवारण समितीने BCCI विरुद्धचा पाकिस्तानचा आरोप फेटाळून लावला आहे. हा निर्णय बंधणकारक राहणार असून याविरुद्ध अपील करता येणार नाही.’ PCB ने BCCI वर ४४७ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. BCCI ने म्हटले होते की ‘हे कथित MoU स्वीकारण्यास आम्ही बांधील नाही. भारताने सुचविलेल्या ICC महसूल मॉडेलच्या समर्थनाची प्रतिबद्धता पाकने पूर्ण केली नाही. पाकसह मालिका खेळण्यासाठी सरकारची मंजुरी आवश्यक असते. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाक दौऱ्यासाठी सरकारची परवानगी मिळालेली नाही, असे सांगण्यात आले होते.