पाकिस्तानचे माजी कसोटीपटू मोहसीन खान यांनी, पाक क्रिकेट बोर्डातील आपल्या क्रिकेट कमिटी चेअरमन या पदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्याचं काम मोहसीन खान यांच्याकडे होतं. मात्र खान यांनी पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांना आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावी अशी विनंती केली होती. पाक क्रिकेट बोर्डाचे मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून काम पाहणारे वासिम खान मोहसीन यांच्या जागी काम पाहणार आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मोहसीन खान यांच्या खांद्यावर आणखी मोठी जबाबदारी येण्याचीही चर्चा सुरु आहे. पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनीही, मोहसनी यांचे आभार मानत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

२०१९ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळे या स्पर्धेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कर्णधार, प्रशिक्षक वर्ग, संघ व्यवस्थापन आणि निवड समितीमध्ये बदल करणार असल्याचं समजतंय. त्यामुळे आगामी काळात मोहसीन खान यांच्या खांद्यावर कोणती जबाबदारी दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.