आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविणाऱ्या विशेष मुला-मुलींना अन्य सुदृढ खेळाडूंसारखीच सन्मानपूर्वक वागणूक मिळेल, असे केंद्रीय क्रीडा मंत्री सर्बानंद सोनवाल यांनी येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.
मूकबधिर खेळाडूंना नवी दिल्लीत रात्रभर रस्त्यावर राहावे लागले होते. तसेच त्यांना आशियाई स्पर्धेतही अवहेलनेस सामोरे जावे लागले होते. त्याबाबत सोनवाल यांना विचारले असता ते म्हणाले, या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. विशेष खेळाडूंची सक्षम राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात येत असून त्याद्वारे या खेळाडूंच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल. या खेळाडूंना अन्य खेळाडूंप्रमाणेच सर्व सुविधा व सवलती दिल्या जातील अशी मला खात्री आहे.
विशेष खेळाडूंना अनेक वेळा अर्जुन पुरस्कार व अन्य राष्ट्रीय पुरस्कारांकरिता न्यायालयात धाव घ्यावी लागते, या प्रश्नावर सोनवाल म्हणाले, खरंतर या खेळाडूंना न्यायालयात जाण्याची वेळ येऊ नये. यापुढे त्यांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. त्यांच्याकरिता स्वतंत्र पुरस्कार देण्याचा विचार केला जाईल मात्र व्यक्तिश: त्यांना अन्य खेळाडूंबरोबरच अर्जुन व अन्य पुरस्कारांमध्ये स्थान दिले जाईल.
शिवछत्रपती क्रीडानगरीत भारतीय क्रीडा प्राधिकरणाची शाखा सुरू करण्याचा विचार केला जाईल. तेथील क्रीडा सुविधा अतिशय उच्च दर्जाच्या आहेत. या क्रीडानगरीत अनेक जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. त्यामुळेच तेथे कायमस्वरूपी राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचाही विचार केला जाईल असे सोनवाल म्हणाले.
गुवाहाटी येथे पुढील वर्षी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धामध्ये रोलबॉल या खेळाचा प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश करण्याची शक्यता आहे असेही सोनवाल यांनी सांगितले.