अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात कापरेवाडी गावात एक उदयोन्मुख हरहुन्नरी कुस्तीपटू सोनाली कोंडीबा मंडलिक राहते. सोनालीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्ती क्रीडाप्रकारात २ वेळा सुवर्ण पदक मिळवले आहे. त्याशिवायही इतर अनेक स्पर्धांमध्ये भरपूर पदके मिळवली आहेत. पण सध्या घरीच तयार केलेल्या झोपडीच्या तालमीत सोनालीचा सराव सुरू आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून तिचे वडिल ५ व्यक्तींच्या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनालीच्या वडिलांची इच्छा आहे की त्यांच्या मुलीने कुस्ती क्रीडाप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करावे. मुलीला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने ते स्वतःसाठी घर नसतानाही गोठयात राहून तिच्या खेळाची तयारी करून घेत आहेत. सोनाली सध्या कर्जतच्या महाविद्यालयाच १२वीचे शिक्षण घेत आहे. तिला आर्थिक पाठबळ मिळाले तर तिच्या स्वप्नांना नक्कीच भरारी मिळेल आणि ती भारताचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास व्यक्त करत तिला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

(फोटो सौजन्य- राकेश कोते पाटील ट्विटर)

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांना एका ट्विटद्वारे सोनालीच्या संघर्षाची कहाणी समजली. त्यानंतर त्यांनी त्वरित या प्रकरणाची दखल घेत स्तुत्य असा निर्णय घेतला. “सोनालीने खडतर परिस्थितीत मिळवलेल्या या यशाचा मला अभिमान आहे. तिच्याशी, तिचे पालक आणि वस्ताद यांच्याशी माझं बोलणंही झालं. या भगिनीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मी स्वीकारलीय. यशाची अशी अनेक शिखरं ती सर करेल, असा मला विश्वास आहे”, असे ट्विट करत त्यांनी सोनालीला मदतीचा हात दिला.

रोहित पवार यांच्या या स्तुत्य निर्णयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Positive news rohit pawar takes responsibility of young wrestler sonali mandlik training vjb
First published on: 02-09-2020 at 10:16 IST