नवी दिल्ली : सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीमधील अखेरच्या कसोटी सामन्यात १० बळी घेण्याची किमया साधणारा भारताचा अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तातडीने निवृत्ती पत्करली.

नोव्हेंबर २०१३मध्ये सचिन वेस्ट इंडिजविरुद्ध कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्या ऐतिहासिक सामन्यात सामनावीर ठरलेल्या ओझाच्या कारकीर्दीतील तोच कसोटी सामना अखेरचा ठरला. कारण ओझाला त्यानंतर अपेक्षित कामगिरी साकारून भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही. परंतु निवृत्तीची घोषणा करताना ३३ वर्षीय ओझाने कोणतेही कारण दिले नाही. त्याने २००९ ते २०१३ या कालखंडातील २४ कसोटी सामन्यांत ११३ बळी मिळवले आहेत.

‘‘भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न मला साकारता आले, याबद्दल मला अभिमान वाटतो. माझे स्वप्न जगतानाचे अनुभव सांगण्यासाठी मला शब्दही कमी पडतील,’’ असे ओझाने सांगितले. सचिनकडून कसोटी क्रिकेटची टोपी स्वीकारणे, हा कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण असल्याचे ओझाने सांगितले.

आयुष्याच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे, ही जाणीव मला झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून त्वरित निवृत्तीचा निर्णय घेऊन यासंदर्भातील औपचारिक पत्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पाठवले आहे.

-प्रग्यान ओझा

प्रग्यान ओझाची कारकीर्द

प्रकार            सामने  बळी    सर्वोत्तम   झेल

कसोटी            २४     ११३      ६/४७           १०

एकदिवसीय     १८     २१        ४/३८            ७

ट्वेन्टी-२०          ६      १०       ४/२१           १