भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रविवारी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवून इतिहास रचल्यानंतर तिच्या अतुलनीय कामगिरीबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक क्रीडापटूंनी स्तुतिसुमनांचा वर्षांव केला आहे.

गेल्या चार-पाच वर्षांच्या काळात अनेक स्पर्धाच्या अंतिम फेरीत धडक मारूनही नेहमी उपविजेतेपदावर समाधान मानाव्या लागणाऱ्या सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा २१-७, २१-७ असा सरळ दोन गेममध्ये धुव्वा उडवून कारकीर्दीत पहिल्यांदाच जगज्जेतेपदावर नाव कोरले.

भारतीय बॅडमिंटनसाठी सोनेरी दिवस. सिंधूने संपूर्ण भारताला अभिमान वाटावा, अशी कामगिरी केली आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. सिंधूचे यश भावी पिढय़ांना प्रेरणा देईल!

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

बॅडमिंटनला नवी ‘फुलराणी’ मिळाली आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल सिंधू तुझे अभिनंदन. तुझ्या खेळाद्वारे असेच सर्वाना प्रेरित करत राहा!

– राज्यवर्धनसिंग राठोड,

माजी केंद्रीय क्रीडामंत्री

सिंधू मला तुझा अभिमान वाटतो. तुझी कामगिरी सोन्यासारखी आहे.

– कॅरोलिना मरिन, स्पेनची बॅडमिंटनपटू

जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणे, हे फार अभिमानास्पद असून सिंधूचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधील पदकासाठी तिला शुभेच्छा!

– अभिनव बिंद्रा, नेमबाज

सिंधूच्या यशामुळे देशातील चाहत्यांचा बॅडमिंटनकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी अपेक्षा आहे. धन्यवाद सिंधू, पुरेसे पाठबळ असल्यास एखादा खेळाडू काय करू शकतो, हे तू दाखवून दिलेस!

– ज्वाला गट्टा, माजी बॅडमिंटनपटू

सिंधूने अंतिम सामन्यात अविश्वसनीय असा खेळ केला. ओकुहाराला इतक्या सहज नमवण्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही.

– अजय सिंघानिया, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस

सिंधू तू प्रत्येक स्पर्धेनंतर भारतीय बॅडमिंटनचा दर्जा उंचावत आहेस. कारकीर्दीत तुला अधिकाधिक यश लाभो, यासाठी शुभेच्छा!

– दीपा मलिक, पॅरालिम्पिकपटू

बॅडमिंटनच्या नव्या जगज्जेतीचे अभिनंदन. सिंधू तू वेळोवेळी भारतवासीयांची मान अभिमानाने उंचावली आहेस.

गौतम गंभीर, माजी क्रिकेटपटू